Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Konkan › सरंबळ हाणामारी; 10 जणांना अटक

सरंबळ हाणामारी; 10 जणांना अटक

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 10:48PMकुडाळ :  शहर वार्ताहर

वाळू वाहतुकीच्या वादातून सरंबळ-बागवाडी येथे वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ असे दोन गट एकमेकांना भिडले. गुरुवारी सायंकाळी  6 वा. च्या सुमारास  दोन गटांत झालेल्या या तुंबळ हाणामारीत  12 जण जखमी झाले.  परस्परविरोधी फिर्यादीनुसार दोन्ही गटांच्या सुमारे 20-25 जणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांतील 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गुरुवारपासून तहसीलदारांच्या आदेशानुसार  सरंबळ-बागवाडी येथे वाळू वाहतूक बंद आहे. वाळू रॅम्पवर पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

सरंबळ-बागवाडी रस्ता सततच्या वाळू वाहतुकीमुळे खराब झाला असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागवाडीतील ग्रामस्थांनी गुरुवारी तिसर्‍यांना रास्ता रोको आंदोलन करीत वाळू वाहतूक  रोखली. दरम्यान, नायब तहसीलदार श्री. मठकर यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्या ग्रामस्थांसह वाळू व्यावसायिकांशी चर्चा केली. तसेच पुढील निर्णय  होईपर्यंत वाळू वाहतूक बंद ठेवावी, अशा सूचना देत वाळू रॅम्पला पोलिस संरक्षण देण्याबाबतचे पत्र कुडाळ पोलिसांना दिले. मात्र, सायंकाळी वाळू व्यावसायिक समर्थक व विरोधी बागवाडी ग्रामस्थ यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. या  मारहाणीत अमोल कदम (35),  अरूण कदम (34), नारायण कदम (34), सिताराम कदम (39), वैभव दिलीप कदम (25) तसेच श्यामसुंदर करलकर (28), सुचित्रा सुधीर भोवर (47), नंदकिशोर भोवर (50), दत्ताराम सत्यवान  वराडकर (34), सुधीर  रघुनाथ भोवर (55), मिलिंद लक्ष्मण हळदणकर (24)  व  भालचंद्र श्याम नाईक (38, सर्व रा. सरंबळ) असे दोन्ही गटातील 12 जण जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात  आले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार केले. अमोल कदम यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी  तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. दरम्यान, ग्रामीण रूग्णालयात ग्रामस्थ  व वाळू व्यावसायिकांची मोठी गर्दी झाली होती.

वाळू व्यावसायिक समर्थक दत्ताराम सत्यवान वराडकर (32, रा. सरंबळ भाटीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत ते घरी जात असताना रावजी कदम (कदमवाडी) हे त्यांच्या घरी येवून रॅम्पवरील कामगारांना (भैय्यांना) गावातील ग्रामस्थ दमदाटी करून भैय्यांना  मारा, हाकलून द्या, असे म्हणत त्यांच्या झोपड्या जाळण्याचा तसेच भैय्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत  असे सांगताच आपण लागलीच रॅम्पवर गेलो असता तेथे वाळू ठेकेदार योगेश नाईक यांचा मॅनेजर अमोल राजाराम कदम यांच्यासह 20 ते 25 लोक उपस्थित होते. त्यातील काही लोकांच्या हातात लोखंडी कोयता, फावडे व अन्य लोकांकडे दांडे होते.  यावेळी अमोल कदम व नारायण कदम  हे ग्रामस्थांना समजवण्याकरता पुढे गेले असता ग्रामस्थ आक्रमक  होवून शिवीगाळ करून तुम्ही  वाळूच्या पैशावर उर्मट झालात, असे म्हणत आरोपींनी अमोल कदम याला पकडून त्याच्या तोंडावर फावड्याने वार केला. अमोल खाली पडताच अन्य ग्रामस्थांनी लाकडी दांड्याने व लाथाबुक्याने मारहाण केली तसेच नारायण कदम, सीताराम कदम, रवींद्र कदम, नीलेश कदम व आपणासही  ग्रामस्थांनी दांड्याने मारहाण करीत तुमचे  हातपाय तोडून  टाकू, अशी धमकी  देत  रॅम्पवरील दुचाकीची  व लाकडी शेडची तोडफोड केली व भैय्यांच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केला.

वराडकर यांच्या  या फिर्यादीनुसार रोशन तानाजी साटम (28), श्यामसुंदर गोविंद करलकर (28),  रघुनाथ सुधीर भोवर (23),  मिलिंद लक्ष्मण हळदणकर (24), सुधीर रघुनाथ भोवर (55), नीलेश दत्ताराम हळदणकर (34), सुभाष शंकर दांडकर  (48),  नंदकिशोर भोवर, जयदीप भोवर, रवींद्र भोवर, सौ. सुचित्रा सुधीर भोवर आदींसह 15 जणांवर  कुडाळ  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील रोशन साटम,  श्यामसुंदर करलकर, रघुनाथ भोवर, मिलिंद हळदणकर, सुधीर भोवर, निलेश हळदणकर व सुभाष दांडकर या सात जणांना व वाळू व्यावसायिक योगेश नाईक, भालचंद्र नाईक, दत्ताराम वराडकर अशा दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. शिंदे करीत आहेत. दरम्यान भाजपाचे प्रवक्‍ते काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष  चारूदत्त देसाई, बंड्या सावंत आदींनी पोलिस निरीक्षक  श्री. शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.