Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Konkan › हळदीकुंकू वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वाटप

हळदीकुंकू वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वाटप

Published On: Feb 02 2018 7:26PM | Last Updated: Feb 02 2018 7:26PMआचरा : वार्ताहर

हळदीकुंंकू निमित्त सौभाग्य लेण्याबरोबरच वाण म्हणून गृहपयोगी विविध  वस्तूुचे वाटप केले जाते. आचरा- वायंगणी येथील ज्ञानदीप हायस्कूलने या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वाटप करत मासिक पाळी काळातील स्वच्छते विषयी जनजागृती केली.   महिलांमध्ये मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज दूर करतानाच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन केले.  

सरपंच सौ.संजना रेडकर, स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत हडकर, सदा राणे, दीपक सुर्वे, मुख्याध्यापक श्री. टकले, अ‍ॅड.समृद्धी आसोलकर, सुरेश सावंत, अरूण सावंत आदी या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. महिलांच्या मनात सुरक्षितता निर्माण व्हावी,  शरीरस्वच्छतेचे महत्त्व समजावे, गैरसमज दूर व्हावेत यासाठी मार्गदर्शन व जनजागृती उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापक श्री. टकले  यांनी सांगितले.


प्रशालेत विद्यार्थींनींसाठी ‘उत्कर्षा’ रुम

वायंगणी हायस्कूलमध्ये परिसरातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थींनी येतात. त्यांना काही वेळा शारीरिक अडचणींना, समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी विद्यार्थींनीच्या मनात भिती निर्माण होवून असुरक्षततेची भावना निर्माण होते, मानसिक दडपण निर्माण होते, म्हणूनच प्रत्येक विद्यार्थींनीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी उत्कर्षा रूमची व्यवस्था वायंगणी हायस्कूलमध्ये करण्यात आल्याची माहिती वायंगणी गावच्या सुकन्या अ‍ॅड.समृद्धी आसोलकर यांनी दिली. मासिकपाळी बाबतचे असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच शारीरिक आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी, याबाबत उत्कर्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या, उपस्थित महिलांना व विद्यार्थींनींना अ‍ॅड. समृद्धी आसोलकर व शिक्षिका प्रभा हळदणकर यांनी मार्गदर्शन केले.