Fri, Jul 19, 2019 01:25होमपेज › Konkan › वेंगुर्लेत चंदन, जिवंत कासव जप्त; सात जणांना अटक

वेंगुर्लेत चंदन, जिवंत कासव जप्त; सात जणांना अटक

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:50PMकुडाळ : प्रतिनिधी

वेंगुर्ला कॅम्प परिसरात कुडाळ व कडावल वनक्षेत्रपाल यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात चंदन, चंदनाच्या साली, जिवंत कासव व मृत कासवाचे अवशेष, शिकारीचे साहित्य असा मिळून 2 लाख 88 हजार 408 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने जप्त करत सात संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, वन्यप्राण्यांची शिकार करणे, मांस खाणे, चंदनाची चोरी करणे याअंतर्गत  या सातही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सातही जणांना  शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल तथा तपासी अधिकारी पी. जी. कोकीतकर यांनी दिली. 

वनक्षेत्रपाल  फिरते पथक सावंतवाडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुडाळ वनक्षेत्रपाल पी. जी. कोकीतकर व कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे यांनी शुक्रवारी वेंगुर्ला कँम्प भागात अचानक छापा टाकला. यावेळी वेंगुर्ला म्हाडा येथील अजित गावडे यांच्या घराची तपासणी केली असता 17.554 कि.ग्रॅम चंदन व 6.705 कि.ग्रॅम चंदनाच्या साली मिळून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याच परिसरात 6 झोपड्या व एका चिरेबंदी घराची झडती घेण्यात आली असता या झडतीत चंदन-7.414 कि.ग्रॅम, जिवंत कासव-9, मृत कासवांचे अवशेष-75, शिकारीसाठी वापरण्यात येणारे तीर-कामटे-2, बाण व कोयता मिळून 2 लाख 88 हजार 408 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने हस्तगत केला व संशयीत अजित गणपत गावडे, मयुर विजय आंगचेकर,गणेश अनंत गिरी, सुरेश जयराम पवार,चंदु जयराम पवार, शिवाजी तुकाराम पवार व राजु अर्जुन पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता संशयीतांनी गुन्हाची कबुली दिल्यामुळे त्यांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. शनिवारी सातही संशयीतांना कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल संजय कदम, कुडाळ वनक्षेत्रपाल पी.जी.कोकीतकर, अमोल चिरमे, मठ वनपाल आर.जी.मडवळ, वनरक्षक एस.एस.कांबळे वनरंक्षक व्ही.एस.नरळे, सुनिल सावंत, एस.एम.सावंत, जयश्री शेलार, प्रियांका पाटील, संतोष यादव, सचिन कांबळे, सारीक फकीर, सदानंद परब आदींचा या पथकात सहभाग होता.  दरम्यान कुडाळ कोर्टासमोर जीवंत कासवांना दाखवून सायंकाळी उशीरा त्या कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल कोकीतकर यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास श्री. कोकीतकर करीत आहेत.

वनविभागाच्या कारवाईने  अवैद्य धंदेवाले धास्तावले
 माणगाव खोर्‍यातील मोरे येथील शासकीय वनात अवैद्यरीत्या साग झाडाची तोड करणार्‍या रॅकेटचा धंदा उद्धस्त केल्यानंतर वेंगुर्ला येथे चंदन लाकूड,चंदन साली,जीवंत कासव, कासवाचे अवशेष  बाळगल्या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई वनविभागाच्या पथकाने करून गुन्हा दाखल केल्यामुळे या क्षेत्रात अवैध काम करणार्‍यांचे धाबे दणादणले आहेत.