Wed, Apr 24, 2019 20:03होमपेज › Konkan › सवतकडा धबधब्यावर कोल्हापूरसह इचलकरंजीच्या १३ जणांना वाचविले

सवतकडा धबधब्यावर कोल्हापूरसह इचलकरंजीच्या १३ जणांना वाचविले

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMराजापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरसह इचलकरंजी येथून राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथे पर्यटनासाठी आलेले 13 पर्यटक रविवारी दुपारी मुसळधार पावसामुळे वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने सवतकडा धबधब्याच्या प्रवाहात अडकले. दरम्यान, प्रसंगावधान राखून या सर्वांना रत्नागिरीच्या रत्नदुर्ग माऊंटेनियर्सच्या सदस्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

कोल्हापूर, इचलकरंजीतून रविवारी पर्यटकांचे समूह राजापुरातील प्रसिद्ध सवतकडा धबधब्यावर जलप्रपाताचा आनंद लुटण्यासाठी आले होते. स्थानिक ग्रामस्थ ज्या भागात जाण्याचे धाडस करत नाहीत, त्याच भागात यातील काही पर्यटक गेले होते. याच दरम्यान मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे पर्यटकांपैकी काही युवक धोकादायक स्थितीत अडकले. हा प्रकार लक्षात येताच इतरांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. याच दरम्यान या भागात रत्नदुर्ग माऊंटेनियर्सचे सदस्यही गेले होते. त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाहात अडकलेल्या 13 पर्यटकांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांनीही त्यांना मदत केली. दरम्यान, या पर्यटकांची नावे मात्र समजू शकली नाहीत. 

दरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वीच धबधबे, धरणे अशा ठिकाणी पर्यटकांनी सुरक्षितता बाळगण्याची आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख धबधबे तसेच धरणांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तरी देखील काही पर्यटक असे फलक तसेच स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून दु:साहस करत असल्याचे निदर्शनास आले आहे.