Mon, Mar 25, 2019 14:03होमपेज › Konkan › भिडे गुरुजींच्या बैठकीदरम्यान तीव्र निदर्शने

भिडे गुरुजींच्या बैठकीदरम्यान तीव्र निदर्शने

Published On: Aug 22 2018 7:05PM | Last Updated: Aug 22 2018 11:00PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात बुधवारी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.  एका बाजूला गुरुजींच्या सुरक्षेसाठी सभागृहाला चारही बाजूने पोलिसांनी घेरले असताना आंदोलकांनी त्यावर मात करीत सभागृहाकडे जाणारे रस्तेदेखील रोखले. तब्बल पाच तास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बंदिस्त सभागृहात भिडे गुरुजी यांची बैठक सुरू होती. एका बाजूला घोषणाबाजी, दुसर्‍या बाजूला बैठक असा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला होता.

शहरातील बन्या बापू चितळे सभागृहात भिडे गुरुजी यांनी बुधवारी  22 रोजी सभा घेतली. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सभागृहाकडे येणारा दुसरा मार्ग निदर्शनकर्त्यांनी रोखून धरला होता. त्यामुळे या ठिकाणी येणारे दोन्ही मार्ग बंद झाले. या दरम्यान तब्बल पाच तास भिडे गुरुजी यांच्याविरोधात निदर्शने सुरू होती. आंदोलनकर्त्यांनी हातात आंबे दाखवून भिडे गुरुजींविरोधात घोषणा दिल्या. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील निदर्शने थांबवून बहुजन कार्यकर्ते जुना भैरी मंदिराजवळ जमले. त्यानंतर त्या ठिकाणी बॅरिकेटस् टाकून पोलिसांनी निदर्शनकर्त्यांना तेथेच थांबविले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी  यांनी आंदोलनकर्ते सुभाष जाधव व अन्य कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. बॅरिकेट्स तोडून बहुजन कार्यकर्ते नवा भैरी मंदिरापर्यंत आले. त्या ठिकाणी पुन्हा या सर्वांना रोखण्यात आले. बंदूकधारी पोलिस, अश्रूधुर, लाठ्याकाठ्या अशी सर्व यंत्रणा सज्ज होती. दुसर्‍या बाजूला निदर्शने करण्यात येत होती. हातात आंबे घेऊन घोषणाबाजी सुरू होती.

या आंदोलन दरम्यान एक कार्यकर्ता शेजारील इमारतीवर चढला आणि आपण इमारतीवरुन उडी मारतो, असा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला इमारतीवरुन खाली उतरविले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुरादपूरकडून येणारा रस्तादेखील आंदोलनकर्त्यांनी अडविला. यामुळे तेथेही घोषणाबाजी सुरू झाली. या सर्व वातावरणात सभागृहात बैठक मात्र सुरुच होती. सभागृहाच्या तीनशे मीटर अंतरावर आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडविले आणि निदर्शने सुरुच ठेवली होती. भर पावसातही आंदोलक तळ ठोकून होते.  सायंकाळी उशिरापर्यंत भिडे गुरुजींची बैठक सुरुच होती.