Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Konkan › चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी

चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:11PMचिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणार्‍या पाचजणांना पोलिस आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जेरबंद केले आहे. यातील चौघे कोल्हापूर येथील असून ते चिपळूणमध्ये सांबर शिंगाची विक्री करण्यास आले होते. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.

ह्युंडाई अ‍ॅसेंट ही आलिशान कार घेऊन पाचजण सांबर शिंगाची विक्री करण्यासाठी बुधवारी रात्री चिपळूणमध्ये आले होते. यामध्ये चालक अजय साळुंखे (36, मुंबई), दीपक मुसळे (सडोली-दुमाला), राकेश राजेंद्र भोसले (कळंबा रोड), सागर रघुनाथ नलावडे  व समीर रघुनाथ नलावडे (दोघेही रा. नाळे कॉलनी, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. अजय साळुंखे यांची कार घेऊन कोल्हापूर येथील चार तरूण सांबर शिंग विक्रीसाठी बुधवारी रात्री चिपळुणात येणार असल्याची खबर चिपळूण पोलिसांना मिळाली. याची माहिती मिळताच बुधवारी रात्री 12 वा. गुहागर बायपास रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांना हवी असलेली अ‍ॅसेंट कार निदर्शनास आली. या नंतर पोलिसांच्या डी. बी. स्क्‍वॉडने चालकासह पाचजणांना ताब्यात घेतले.

यावेळी तपासणी केली असता त्यांच्याजवळ सांबर शिंग आढळून आले. पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या तरूणांची चौकशी केल्यानंतर हे सांबर शिंग एकाला विक्रीसाठी येथे आणले होते, हे स्पष्ट झाले. चौकशीनंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या पाचहीजणांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल, सांबर शिंग आणि कार जप्‍त करण्यात आली. परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीअंती वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. गुरुवारी दुपारी पाचहीजणांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वनविभागाच्या वतीने अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने या पाचजणांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सायंकाळी उशिरा पाचहीजणांची रत्नागिरी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. अधिक तपास वनाधिकारी निलख करीत आहेत.

अँटिक पीस म्हणून सांबर शिंगाला किंमत...
सांबर हे शेड्यूल तीनमधील वन्यजीव आहे. त्यामुळे कायद्याचे या प्राण्याला संरक्षण आहे. मात्र, सांबर शिंग अँँटिक पीस म्हणून अनेक ठिकाणी ठेवले जाते. पूर्वीच्या काळी सांबर शिंग कलात्मक पद्धतीने प्रदर्शित व्हायचे. अलीकडच्या काळातदेखील अँटिक पीस म्हणून त्याला मागणी आहे. हे सांबर शिंग विकून त्यातून पैसे कमविण्याचा उद्देश पुढे आला असून यातून ही तस्करी झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.