Tue, May 21, 2019 22:26होमपेज › Konkan › संचमान्यतेत हलगर्जी; वेतनवाढ रोखणार

संचमान्यतेत हलगर्जी; वेतनवाढ रोखणार

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 12:04AMरत्नागिरी : प्रतिनिधी

सन 2017-18 च्या संचमान्यतेसाठी या वर्षापुरती 1 जानेवारी 2018 पर्यंत विद्यार्थ्यांची भरलेली माहिती ग्राह्य धरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांची आधारकार्डची अट शिथिल करून 24 तारखेपर्यंत संचमान्यता करावी, यासाठी आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे आदेश शिक्षण विभागाने 15 जानेवारी रोजी दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी न केलेल्या  शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या सलग दोन वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.

वारंवार मुदतवाढ देण्यात येऊन सुद्धा काही ठिकाणी अद्यापही शाळांची संचमान्यता पूर्ण झाली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच संचमान्यतेसाठी आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसून संच मान्यता व शिक्षक बदली कामात हलगर्जी करणार्‍या संबंधित शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या सलग दोन वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संच मान्यतेबाबत 23 जानेवारीपर्यंत झालेले काम पाहिल्यास असे दिसून येते की, शाळा स्तरावरून जवळजवळ सर्व काम पूर्ण झालेले आहे. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये केंद्र प्रमुख लॉगिन मधील काम बर्‍याच प्रमाणात अपूर्ण आहे. त्यामुळे सर्व केंद्र प्रमुखांना बुधवार दि.24 रोजी रात्री 12 पर्यंत लॉगिनमधील सर्व काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. कारण 1 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.त्यासाठी संच मान्यतेबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे संचमान्यतेसंदर्भात कोणत्याही शाळेने अथवा केंद्र प्रमुखांनी आपल्या स्तरावरील काम अपूर्ण ठेवू नये, असे आदेश देण्यात आले होते.

प्रमुख लॉगिनमधील अपूर्ण कामाची माहिती ग्रामविकास विभागाकडून घेतली जाणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या दिनांक 22 जानेवारीच्या आदेशानुसार संच मान्यता व शिक्षक बदली कामात हलगर्जी करणार्‍या संबंधित शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या सलग दोन वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, अद्यापही अनेक शाळांची संचमान्यता अपूर्ण आहे. काही शाळांची संचमान्यता काही तांत्रिक कामांमुळे अर्धवट राहिली आहे. राज्यात अनेक शहरांमधील शाळांच्या संचमान्यता अपूर्ण असल्यामुळे अधिकारी संचमान्यतेला मुदतवाढ मागत आहेत. परंतु, अद्याप तरी संचमान्यतेला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.