Mon, Mar 25, 2019 02:52
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कणकवलीत भक्‍तिमय वातावरणात साई दिंडी 

कणकवलीत भक्‍तिमय वातावरणात साई दिंडी 

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:40PM

बुकमार्क करा
 

कणकवली : शहर वार्ताहर  

‘साईनाथ गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी...,पायी हळू हळू चाला मुखाने साई नाम बोला  .....’ अशा साई नाम घोषात, वारकर्‍यांच्या अभंग जपात टाळ, मृदूंग, वीणाच्या तसेच ढोल ताशाच्या गजरात  कणकवली शहरातून गुरूवारी सायंकाळी ‘सबका मालिक एक है’ या महानाट्याच्या पार्श्‍वभूमीवर भव्य साई दिंडी काढण्यात आली.  पटकीदेवी येथे युवानेते संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ही दिंडी पटकीदेवी-बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक ते साई संपर्क कार्यालय अशी काढण्यात आली.

जिल्ह्यातील असंख्य साई भक्‍त शहरातील महिला, पुरुष, तरुण, बालगोपाळ या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . वागदे येथे 2 फेबु्रवारीपासून  ‘सबका मालिक एक है’ हे महानाटय होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर साई भक्‍तांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती तसेच वातावरण निर्मितीसाठी ही दिंडी काढण्यात आली. यामध्ये साई बाबांची हुबेहूब वेशभूषा साकरण्यात आली होती. दशावतार कलावंतांच्या राधाकृष्ण वेशात ,तर शेषनागावर साई बाबा विराजनमान असे  साईचे विविध देखावे होते .पारंपारिक वेषभूषेत महिला, युवती हाती भगवे झेंडे घेऊन दिंडीत  उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. पुरुषांची दोन तर महिलाचे एक  ढोल पथक, घोडे, बैलगाडी रथ, या दिंडीचे लक्ष वेधत होते . 

टाळ, मृदूंगाच्या ठेक्यात वारकरी संप्रदायचे वारकरी मंडळी साई नामाचा अखंड जप करत होते. या दिंडीमुळे कणकवली साई नामस्मरणात न्हाऊन निघाली होती. भालचंद्र महाराजाच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्या नंतर साईबाबांच्या दिंडीने पुन्हा एकदा शहर भक्‍तिमय झाले होते. या दिंडीत संदेश पारकर यांच्यासह नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, प्रा. दिवाकर मुरकर, अवधूत मालनकर, साई भक्त विशाल कामत, राजू मानकर, राजन परब, संजय मालंडकर, गुरु पावसकर, दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर, नीलम पालव, सुमेधा अंधारी, बुवा शशी राणे, वैशाली आरोलकर, सुहास वरुणकर, संतोष पुजारे,वारकरी सांप्रदायाचे विश्‍वनाथ गवंडळकर, दशावतार कलावंत बी.के.तांबे, नाट्य मंडळींसह साईभक्‍त ,कणकवलीवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .