Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Konkan › सागर बंगल्याचा महिन्याचा खर्च एक लाख...उत्पन्‍न शून्य!

सागर बंगल्याचा महिन्याचा खर्च एक लाख...उत्पन्‍न शून्य!

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:04PMगणेश जेठे
 

विश्रामगृह म्हणावं की स्मारक? असा प्रश्‍न निर्माण होण्याइतपत स्थिती सध्या वेंगुर्ले येथील ऐतिहासिक सागर बंगला या शासकीय विश्रामगृहाची झाली आहे. लाखो रुपये खर्च करून या विश्रामगृहाची डागडुजी आणि सुशोभिकरण अधुनमधून केले जाते. त्याशिवाय चौकीदारांचा पगार, लाईटबिल आणि इतर सुविधांसाठी महिन्याला एक लाख रुपये खर्च येतो. परंतु शासनाच्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या धोरणामुळे हे सुट नेहमी पाहुण्यांच्या प्रतीक्षेत असतात. शासन या विश्रामगृहातील सुटचे आरक्षण देताना जी नियमावली पुढे करते त्यामुळे प्रशासकीय कटकटींपेक्षा खासगी हॉटेलमध्ये राहण्यातच पर्यटक समाधान मानतात आणि हे विश्रामगृह मात्र रिकामीच असते.

इंग्रज राजवटीत वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्‍वर या समुद्र किनारी कातळावर हे विश्रामगृह उभारण्यात आले आहे. पूर्वी याला डाकबंगला असे म्हटले जात होते. आता ते शासकीय विश्रामगृह म्हणून वापरले जात आहे. वेंगुर्लेचा समुद्र किनारा स्वच्छ, सुंदर आणि नितळ सौंदर्याने नटलेला आहे. या समुद्र किनार्‍यावर हे जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेले सागर बंगला हे रेस्ट हाऊस पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ आहे. दररोज या रेस्ट हाऊसला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या शेकडोच्या घरात आहे. विशेषतः रशियन आणि गोव्यात आलेले परदेशी पर्यटक या विश्रामगृह परिसरात आवर्जून येतात. याच विश्रामगृहापासून शंभर मीटर अंतरावर दीपगृह आहे. या दीपगृहालाही भेट देणार्‍यांची संख्या खूप आहे. या विश्रामगृहाला लागून वेंगुर्ले बंदर असल्याने मच्छीमार आणि मत्स्य ग्राहकांची वर्दळ असतेच. पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असा रुबाब या विश्रामगृहाचा आहे. असे असतानाही या रेस्ट हाऊसला राहणार्‍या पाहुण्यांची संख्या नगण्य आहे. 

खरेतर जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी, कणकवली, ओरोस, कुडाळ येथील विश्रामगृहांवर सरकारी पाहुण्यांची वर्दळ नेहमी असते. शासकीय कामकाज आटोपून पुन्हा मुंबई व कोल्हापूर, पुणेकडे परतणे सोपे जाते. त्यामुळे महामार्गावरील विश्रामगृहावर निवास करणे सोयीचे ठरते. मात्र, एका टोकाला असलेल्या वेंगुर्ले येथील या सागर बंगल्यावर राहणे केवळ पर्यटनदृष्ट्याच योग्य वाटते. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठीच आलेला एखादा सरकारी पाहुणा या बंगल्यावर राहण्याचा आनंद उपभोगतो. तेव्हाच तेथील चौकीदारांना काम मिळते. इतरवेळी मात्र हा बंगला सामसूम वातावरणातच असतो. या रेस्टहाऊसचे आरक्षण सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळते. त्याची नोंद नंतर सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करून पास घ्यावा लागतो. सर्वसाधारण इतर विश्रामगृहांची आरक्षणाची पद्धतही अशीच आहे. मात्र, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी असा प्रवास करून आरक्षण मिळवून वेंगुर्ले येथील सागर बंगल्यावर रहायला जाणे अलिकडच्या काळात कुठल्याही पर्यटकाला परवडणारे नाही. त्यामुळे हे विश्रामगृह महिन्यातील बहुतांश दिवस बंद असते.

सागर बंगल्याच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर नेहमीच दरवाजा आतून बंद असतो. दरवाजावरील बेल दाबल्यानंतर तेथील चौकीदार येतो, आरक्षणाचा पास असेल तरच आत पाऊल टाकायची परवानगी मिळते. अन्यथा हे देखणे विश्रामगृह बाहेरूनच पाहून मागे परतावे लागते. या विश्रामगृहावर एकूण चार सुट आहेत. दोन लक्झरी सुट असून दोन सुट त्यापेक्षा जरा कमी दर्जाचे आहेत. यातील दोन सुट तर अगदी समुद्राच्या आतमध्ये गेलेल्या मोठ्या खडकावर आहेत. त्यामुळे समुद्राची गाज ऐकत, खडकांवर आदळणार्‍या लाटांसोबत या सुटमध्ये राहण्याचा आनंद काही औरच आहे. परंतु हा आनंद पर्यटकांना देण्याची मानसिकता आणि व्यवहारिक दृष्टिकोन सरकारकडे नाही. 

या विश्रामगृहावर तीन ते चार चौकीदार नेमणुकीला असतात. त्यांचा महिन्याचा पगार, लाईट बिल, अधूनमधून होणारी दुरुस्ती, देखभालीचा खर्च हा सर्व खर्च विचारात घेतला तर तो एक लाखाच्या वर जातो आणि उत्पन्‍न मात्र शून्य. शासनाने व्यवसायिक दृष्टिकोन अवलंबला तर या विश्रामगृहावरील सुट पर्यटकांना खुले करता येऊ शकतात. अगदी काही हजारात दिवसाचे भाडे देऊन पर्यटक राहण्यास उत्सुक असतात. त्याचा फायदा शासनाने घेणे आवश्यक आहे. वेंगुर्लेमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांना मुबलक प्रमाणात लक्झरी हॉटेल्स नाहीत. अशावेळी सागर बंगल्याचा वापर शासनाने व्यवसायिक दृष्ट्या केला तर यातून सरकारलाही मोठे उत्पन्‍न मिळू शकेल. मात्र, लोकांच्या करातून गोळा होणारा पैसा अशा पद्धतीने नाहक खर्च करण्याचे शासनाचे धोरण कायम राहिले तर सागर बंगल्याची अवस्था आणखी बिकट होत जाण्याची भीती आहे. या विश्रामगृहात  रहायला जर माणसेच येणार नसतील तर त्याचा जिवंतपणा किती काळ राहील? ही शंका आहेच.

शरद पवार यांचे आवडते ठिकाण

असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा राजकीय जीवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या वाट्याला अस्थिरता आली, अस्वस्थता वाटली तेव्हा तेव्हा ते आवर्जून या सागर बंगला रेस्ट हाऊसला रहायला आले. समुद्राच्या दिशेने असलेल्या दोन नंबरच्या व्हीव्हीआयपी सुटमध्ये ते अनेकवेळा राहिले आहेत. या बंगल्यासारखे आनंददायी स्थळ जगात अन्यत्र कुठेही नाही असे त्यांनी यापूर्वी आवर्जून सांगितले आहे. इतके महत्त्व असलेल्या या बंगल्याकडे शासन व्यवहारिकदृष्ट्या पाहत नाही, याची खंत वेंगुर्लेवासीय आवर्जून व्यक्‍त करतात.