Thu, Jun 27, 2019 18:09होमपेज › Konkan › जिल्ह्यात गोव्यासारखे सेफ्टी प्रोजेक्ट

जिल्ह्यात गोव्यासारखे सेफ्टी प्रोजेक्ट

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 9:05PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील संवेदनशील 14 सागरी किनार्‍यांसह (बीच) आणखीन 18 किनार्‍यांवर गोव्याच्या धर्तीवर बीचसेफ्टी योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर बीच सुरक्षा व्यवस्थापक, प्रत्येक बीचवर वरिष्ठ बीच निरीक्षक  आणि अतिसंवेदशील बीचवर स्पीडबोट, जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. जीवरक्षकांना वीस हजार रूपये मानधनासह एक कोटीचा सुरक्षा विमाही देण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.

गेल्या महिन्यात आरेवारे बीचवर  एकाच कुटुंबातील पाच व्यक्‍ती बुडाल्याची दुर्घटना घडली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बीचवर सुरक्षा व्यवस्थेवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. यासाठी खासगी सुरक्षा संस्थांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील बीचवर पर्यटकांच्या  सुरक्षिततेसाठी गेाव्याच्या धर्तीवर सेफ्टीबीच प्रोजेक्ट राबवण्याचा आराखडा तयार केला आहे.

यामध्ये गणपतीपुळे आणि आरेवारेसारख्या अतिसंवेदनशील बीचवर जादा जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. तातडीची मदत पुुरवण्यासाठी स्पीड बोट तसेच बुडालेल्या व्यक्‍तींना बाहेर आणल्यानंतर त्वरित उपचार पुरविणारी एईडी (ऑटोमेटिक एक्सटर्नल डेफीब्रायलेटर) यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथे 12 तर आरेवारे येथे 5 जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. जीवरक्षकांना सध्याचे मानधन अत्यंत तुटपुंजे असल्याने त्यांना वीस हजार रूपये मानधनासह सुरक्षा विमाही पुरवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.  

भाट्ये येथेही ही यंत्रणा उभारण्यात येणार असून दापोली, गुहागर आणि राजापूर तालुक्यांतील किनार्‍यावरही ही योजना राबवण्यात येणार आहे.   यामध्ये जीवरक्षक नेमताना त्यांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच सागरी सुरक्षा अजून मजबूत कशी करता  येईल, याबाबतही जिल्हा प्रशासनाने संबंधित सुरक्षा संस्थांचे मार्गदर्शन मागविले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक ठेवण्याच्याही सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिल्या. तसेच सागरी सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणारी साधने गुणवत्तेची असावीत, अशा सूचनाही दिल्या आहेत.