Wed, Nov 21, 2018 01:19होमपेज › Konkan › गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात ‘सेफ्टीबीच’

गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात ‘सेफ्टीबीच’

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 8:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावर होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर सेफ्टीबीच प्रकल्प  राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी आरेवारेसह 20 किनार्‍यावर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.  आरेवारे येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर  तातडीने पाऊल उचलताना आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

गेल्या रविवारी आरेवारे किनार्‍यावर पाच  पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी घेत आपत्ती निवारण समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत पर्यटकांची वर्दळ असलेल्या आणि विशेषकरुन सुट्टीच्या दिवसात गर्दी असलेल्या बीचवर  सुरक्षिततेसाठी करण्यात  येणार्‍या  उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी खास गोव्याच्या धर्तीवर राबविण्यात येणारी सागरी सुरक्षा यंत्रणेची अंमलबजावणी करताना सेफ्टीबीच प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

गोव्यात पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी खासगी तत्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून किनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  यामुळे येथील बीचवर अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. यामध्ये जीवरक्षक, अद्ययावत संपर्क यंत्रणा, चिल्ड्रर्न वॉटर पार्क,  लाईफ जॅकेटसह अद्ययावत सुरक्षा साधने पुरविण्यात येतात. तसेच किनार्‍यांचा भौेगोलिक सर्वेक्षण करुन सेफ्टीझोन आणि डेंजर झोन अशी वर्गवारीही करण्यात आली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खास टुरिस्ट पोलिसही नेमण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने किनार्‍यावर सेफ्टी झोन उभारण्याची तयारी प्रायोगिक तत्वावर गणपतीपुळे येथे करण्यात आली आहे. आता या उपाययोजना जिल्ह्यातील अन्य वीस किनार्‍यावर राबवण्यात येणार आहे. यामध्ये भाट्ये, गणेशगुळे,  आरेवारे, गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, वेळणेश्वर, हर्णै, मुरूड, दाभोळ, माडबन, जैतापूर, लाडघर, कद्रे, मुसाकाजी,  नाटे, गुहागर, वरवडे, कुर्ली आदी बीचचा समावेश करण्यात येणार आहे.   यासह किनार्‍यावर टेहळणी मनोरे, गस्ती पथके, सीसीटिव्ही वॉचसह नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क आदी यंत्रणांचा यामध्ये समावेश आहे.