Thu, Dec 12, 2019 09:39होमपेज › Konkan › महिलांच्या फिटनेस गुरू: साधना निकम

महिलांच्या फिटनेस गुरू: साधना निकम

Published On: Oct 16 2018 1:42AM | Last Updated: Oct 15 2018 8:01PMसिंधुदुर्ग :

आज धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना आरोग्याकडे बघायला वेळ मिळत नाही. विशेषत: महिला कामात सतत व्यस्त असल्यानेे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणून डायबेटीस, ब्लडप्रेशर अशा आजारांनी डोके वर काढले आहे. या सर्वातून महिलांची सुटका व्हावी, त्यांचे आरोग्य चांगले रहावे  यासाठी देवगड शहरात सौ.साधना निकम यांनी ‘फिटनेस मंत्रा’च्या माध्यमातून स्त्रियांमध्ये  मनोरंजनातून व्यायाम ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. 

सौ. साधना निकम यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. त्या चार वर्षांच्या असतानांच वडिलांचे छत्र हरपले. मुलांची जबाबदारी आईवर पडली. अशा परिस्थितीत आईला हातभार लावत बहिणी व भावाच्या साथीने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नाटक, एकांकिका, नृत्य या स्पर्धेतही  अनेक पारितोषिके मिळविली. परिस्थितीवर मात करत त्यांनी रत्नागिरी येथे डान्स वर्कआऊट व स्पाचे प्रशिक्षण घेत महिलांसाठी फिटनेस मंत्राच्या माध्यमातून मनोरंजनातून व्यायाम ही आधुनिक संकल्पना राबविण्यास सुरूवात केली. यामध्ये गाण्यावर नृत्य करून व्यायाम केला जातो. यामुळे शारीरिक व मानसिक व्यायाम होतो.

दैनंदिन ताणतणावातून महिलांना मुक्‍त होण्यासाठी सौ. साधना निकम यांनी फिटनेस मंत्राच्या माध्यमातून राबविलेली संकल्पना निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

देवगडमधील स्त्रियांसाठी त्यांनी वेलनेस स्पा सेंटर सुरू केले आहे. यामध्ये फक्‍त स्पा नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाजही केले जातात. यामुळे महिलांना फिटनेस राखण्यासाठी एक नवीन दालन निर्माण झाले आहे. सौ. साधना निकम यांना या उपक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा.