Wed, May 22, 2019 14:24होमपेज › Konkan › संपाला हिंसक वळण

संपाला हिंसक वळण

Published On: Jun 09 2018 11:35PM | Last Updated: Jun 09 2018 11:31PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

 एस.टी. कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या अघोषित संपाला जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली आणि दापोली तालुक्यातील पिसई येथे शिवशाही बस फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. दुसर्‍या दिवशीही संप सुरूच असून प्रवासी वाहतूक कोलमडून गेली आहे. 

शुक्रवारपासून एस.टी. कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे एस.टी. वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात एस.टी. गाड्या सोडण्यात येत आहेत. चिपळूण एसटी आगारात शंभर टक्के संप असून गाड्या डेपोत उभ्या आहेत. दरम्यान शनिवारी  सकाळी 9.30 वाजता चिपळूण-पुणे हि शिवशाही बस सोडण्यात आली. मात्र कुंभार्ली घाटात या गाडीची पुढची काच फोडण्यात आली. यानंतर हि गाडी शिरगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच एसटीचे विभागीय अधिकारी गोगरे यांनी चिपळूणकडे धाव घेतली. दरम्यान फोडण्यात आलेल्या शिवशाहीतून प्रवासी उतरून दुसर्‍या शिवशाहीने पुण्याला पाठविण्यात आले. यानंतर शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.यामध्ये शिवशाहीचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.   चिपळूण आगाराचे संपामुळे दोन दिवसात 16 लाखांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात 1500 फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून एसटी सह प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. चिपळूण आगारात 630 कर्मचारी असून सर्वच संपावर गेले आहेत. मात्र संपाच्या दुसर्‍या दिवशी या आगारातून 11 बस फेर्‍या सोडण्यात आल्या. यामध्ये पुणे, शेल्डी, रत्नागिरी, कोळकेवाडी, वीर, भिले या मार्गावर गाड्या सोडण्यात आल्याची माहिती स्थानकप्रमुख सतीश पाटील यांनी दिली. 
दापोली येथून सुटलेली दापोली-मुंबई शिवशाही बसवर दापोली तालुक्यातील पिसई गावाजवळ दगडफेक झाली आहे. मुंबईकडे जात असलेल्या या बसवर दगडफेक झाली. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. दुपारी 12:15वा.च्या दरम्यान मुंबईकडे निघालेली बस होती. खिडक्याच्या काचा मात्र दोन ठिकाणी फुटल्या आहेत. मात्र या संदर्भात कोणतीही तक्रार एसटी प्रशासन अथवा संबंधित एजन्सीकडून करण्यात आलेली नाही. या घटनेचे वृत्त कळताच दापोली एसटी डेपो व्यवस्थापक वैभव कांबळे घटनास्थळी दाखल झाले. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये एकूण 45  प्रवासी होते.  या प्रवाशांची व्यवस्था दुसरी शिवशाही बस सोडून मुंबईकडे जाण्यासाठी करण्यात आली.दापोली डेपोतून एकूण 4 लोकल बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दाभोळ, खेड, पालगड मार्गावर या बसेस सोडण्यात आल्या आहेत.
एस.टी.चे 40 लाखांचे नुकसान
अचानकपणे शुक्रवारी सुरू झालेला एस.टी. कामगारांचा संप शनिवारीही कायम होता. उलट दुसर्‍या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी 10 टक्के चालक-वाहक कामबंद आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे शनिवारी 20 टक्केच फेर्‍या होऊ शकल्या. शुक्रवारी पहिल्या दिवसाच्या कामबंद आंदोलनामुळे महामंडळाचे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

दरम्यान, पहिल्या दिवसापासून कामगारांना कामावर येण्यासाठी अधिकारी वर्गाकडून झालेले प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.

अघोषित संपाच्या शुक्रवारच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याच्या एसटी आगारांतून होणार्‍या फेर्‍या तब्बल 70 टक्के बंद राहिल्या. पहिल्या दिवशी आगार व्यवस्थापकांकडून प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल कारवाई करण्याबाबतच्या नोटीस बजावण्यात आल्या. परंतु, कामगारांनी अजिबात दाद दिली नाही. ही मात्रा लागू पडत नसल्याचे पाहून लाडीगोडी लावण्याचे प्रयत्न झाले. नवीन भरतीच्या चालक-वाहकांना फोन करून कामावर हजर होण्याची विनंती अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. परंतु, या विनंतीचाही काही उपयोग झाला नाही.

एसटी कामगारांनी अचानक सुरू केलेल्या संपामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातून शेवटच्या मोसमातील जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आणण्यासाठी तयार ठेवलेला आंबा आणता येऊ शकला नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यांतर्गत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करणारी मंडळी शुक्रवारी कामाची वेळ संपल्यानंतर आपापल्या मूळ घरी जातात. अशा कामगार वर्गाला एसटी बंद असल्याने आपापल्या घरी जाता आले नाही. त्यांना कामांच्या ठिकाणीच राहावे लागले.

शुक्रवारच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातल्या 70 टक्के बसफेर्‍या बंद राहिल्याने महामंडळाचे 40 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. शनिवारी आंदोलनात सहभागी होणार्‍या कामगारांचे प्रमाण वाढल्याने या दिवसाच्या नुकसानीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी वर्गाची शनिवारची दुपारनंतरची सुट्टी वाया गेली. या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना शनिवारी कामावर यावे लागले.