Wed, Jul 17, 2019 12:17होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील ३० वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास

सिंधुदुर्गातील ३० वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:47PMकणकवली: 

सीमेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 वीरपत्नींना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत ही मोफत प्रवास सवलत वीरपत्नींना मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून आतापर्यंत राज्यातील 639 वीरपत्नींना आजीवन मोफत पास देऊन त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. 

देशाच्या सीमेवर शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना’ आणली आहे. त्यानुसार वीरपत्नींना एस.टी. प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय वीरपत्नींची संख्या अशी : कोल्हापूर-78, पुणे-75, सांगली-71, मुंबई-12, सातारा-90, सोलापूर-33, सिंधुदुर्ग-30, अहमदनगर-29, रायगड (पेण)-16, ठाणे-17, नाशिक-16, औरंगाबाद-15, बीड-15, लातूर-15, बुलढाणा 13, उस्मानाबाद-10, धुळे-9, अकोला-9, अमरावती 9, जळगाव 8, यवतमाळ-8, नागपूर-8, परभणी-6, भंडारा-6, नांदेड-5, वर्धा-3, चंद्रपूर-1, गडचिरोली-1, जालना-1. सर्वात जास्त पास सातारा, तर सर्वात कमी पास चंद्रपूर, गडचिरोली व जालना जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहेत. भविष्यकाळात काळात जास्तीत जास्त वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्राच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाचा स्तुत्य निर्णय

सीमेवर प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान’ योजना लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेंतर्गत राज्यातील 639 वीरपत्नींचा समावेश करून वीरपत्नींना एस.टी.च्या सर्व बसमधून आजीवन मोफत प्रवासाचा लाभ देण्याचा स्तुत्य निर्णयदेखील राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जात आहे.