Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Konkan › एसटी कर्मचार्‍यांचा अघोषित संप

एसटी कर्मचार्‍यांचा अघोषित संप

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:26PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

अघोषित संपात सहभागी होऊन प्रवाशांची गैरसोय करणार्‍या एसटी कामगारांना आगार व्यवस्थापकांकडून कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या. कामगार सेना वगळता बहुतांश संघटना कामबंद आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार मध्यरात्रीपासून संपावर गेले. रत्नागिरी जिल्ह्यातही हे आंदोलन झाले. त्यामुळे रोज एसटीच्या होणार्‍या 1 हजार 329 फेर्‍या न होता अवघ्या 409 फेर्‍या झाल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 765 गाड्यांमधून रोज 1 हजार 329 फेर्‍या होतात. मात्र, अचानक झालेल्या संपामुळे शुक्रवारी अवघ्या 409 फेर्‍या झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. त्याचबरोबर महामंडळाच्या उत्पन्नातही घट झाली. त्यामुळे सर्व आगार व्यवस्थापकांमार्फत आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना प्रवाशांची गैरसोय करू नका, झाल्यास कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली.

मोसमात प्रतिदिन सुमारे 3 लाख 34 हजार प्रवाशांची वाहतूक होते. पावसाळ्यात ही वाहतूक सव्वादोन लाखावर येते. संपकाळात केवळ 30 टक्केच एसटीच्या गाड्या चालू राहिल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 70 टक्के फेर्‍या बंद राहिल्याने जिल्ह्यातील तब्बल लाखभर प्रवाशांची गैरसोय झाली. पगारवाढीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यासह रत्नागिरी विभागातील काही डेपोंमध्ये एसटी कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. संपाची कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. हा संप कुठल्याही अधिकृत संघटनेचा नसून कर्मचार्‍यांनी पुकारला आहे.

एसटी महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचार्‍यांनी गुरुवारी रात्रीपासून काही आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या या अघोषित संपामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 

रत्नागिरी शहर बससेवा दुपारपर्यंत संपूर्ण सुरू होती. मात्र, दुपारनंतर कर्मचारी संपात उतरल्याने शहरी सेवेवर परिणाम झाला. ग्रामीण भागात दुपारपर्यंत 30 टक्के फेर्‍या सुरू होत्या. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, देवरूख, खेड, मंडणगड, राजापूर आणि चिपळूण आगारात कडक बंद पाळण्यात आला. उर्वरित आगारात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व आगारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचार्‍यांमध्ये रोष आहे.  कामगारांनी स्वयंस्फूर्तीने काम बंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. कर्मचार्‍यांनी संप पुकारण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस दिलेली नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. आगाऊ नोटीस दिल्याशिवाय अधिकृतपणे संप पुकारता येत नाही. त्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले असून, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मनमानी विरोधात हा संप पुकारल्याचा संताप एसटी कर्मचार्‍यांनी व्यक्‍त केला आहे.