Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Konkan › आंबेलीत एसटी, डंपर व कारचा तिहेरी अपघात ः पाच गंभीर 

आंबेलीत एसटी, डंपर व कारचा तिहेरी अपघात ः पाच गंभीर 

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:43PMदोडामार्ग ः प्रतिनिधी

दोडामार्ग -तिलारी राज्यमार्गावर आंबेली(नूतनवाडी) येथे एसटी व खडी वाहतूक करणार्‍या डंपर व एक कार  यांच्यात अवघड वळणावर अपघात झाला. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झालेत. एसटीला समोरून डंपरने जोरदार धडक दिली, या धडकेने एसटीच्या मागे असलेली कार गटारात कोसळली. यांतील तिन्ही प्रवासी सुदैवाने बचावलेत. हा विचित्र अपघात गुरुवारी सकाळी 10.30 वा. घडला.
दोडामार्ग -चंदगड एसटी तिलारीच्या दिशेने जात होती. तर खडी वाहतूक करणारा डंपर भेडशीकडून दोडामार्गकडे  येत होता. आंबेली-नूतनवाडी येथील अवघड, अरुंद, तीव्र उतारावर या दोन्ही वहानांमध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे  एसटी मागे येत रस्त्यालगत असलेल्या गटारात गेली, तर याच गाडीच्या मागाहून येणारी झेन कार मागे येणार्‍या एटीला धडकून गटारात कोसळली, सुदैवाने या कारमधील तिघेजण सुखरुप बचावले. मात्र एसटीचे चालक, वाहक, दोन प्रवासी व डंपरचे चालक असे पाच जण गंभीर जखमी झाले. एसटी चालक विनायक प्रमोद बुवा(रा.बेळगाव), वाहक, मलिकजान शेख(चंदगड, तुर्केवाडी), प्रवासी सावित्री चंद्रकांत कदम(पाळये), सचिन गोरे(साटेली-भेडशी) हे जखमी झालेत. तर डंपर चालक कल्पेश धर्णे (रा.साटेली-भेडशी) अशी या जखमींची नावे आहेत.

अपघातावे वृत्त समजताच जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर व स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. श्री. म्हापसेकर यांनी एसटी चालक, वाहक,  दोन गंभीर प्रवासी यांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. त्या नंतर  आपल्या खाजगी गाडयातून सर्व जखमींना दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.  

एसटीच्या मागाहून येणारी झेन कारमधील प्रवासी रावसाहेब राणे, रुपाली राणे, रोहीदास पटेकर हे गोवा-साखळी येथील होते. हे तिघेजण झरेबांबरमधील आपल्या नातेवाईकांकडे जात होते. डंपरने धडक एसटीला दिल्यावर कारला धक्‍का बसून कार गटारात कोसळली. झाडी-झुडुपे वाढल्याने या झाडीत कार राहिली आणि कारचा आधारावर एसटी पलटी व्हायची थांबली. अन्यथा कार एसटी खाली मिळून भीषषण दुर्घटना घटना घडली असती. झाडी वाढल्याने या तिघांना बाहेर काढण्यात अडथळे  येेत होते. नंतर कोयत्याच्या सहाय्याने झाडी तोडून कारमधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात 
आले. 

अपघात होऊन बर्‍याच वेळानंतर पोलिस दाखल झाले होते. दरम्यान  अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांचा रांगा लागल्या होत्या. सर्व जखमींवर दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले.  आंबेली-नूतनवाडी येथील अरुंद अवघड वळणावर यापूर्वी दोन भीषण अपघात झाले आहेत. यामुळे हे वळण अपघात स्पॉटमधून ओळखले जाते. मदत कार्यात पं.स.सदस्य बाबुराव धुरी, लक्ष्मण नाईक, शंकर देसाई, वैभव इनामदार यांनी सहभाग घेतला होता.