Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Konkan › पूर्वसूचना न देता कर्मचार्‍यांचा संप 

पूर्वसूचना न देता कर्मचार्‍यांचा संप 

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 8:45PMदेवरुख : प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या कामगारांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशी वर्गाचे हाल झाले. देवरुख एसटी आगारातील कामगारांनी या संपात सामील होत संप यशस्वी केला असला तरीही 34 चालक, 18 वाहकांनी काही लोकल फेर्‍या केल्या आहेत.  कामगारांनी, कर्मचार्‍यांनी संपाचे कोणतेही कारण अथवा सूचना न देता हा संप पुकारलेला आहे, असे देवरुख आगार प्रमुख शशिकांत मोहीते यांनी सांगितले.
देवरुख आगारातून गाड्या न सुटल्याने ग्रामिण भागातील प्रवासी वर्ग व नोकरीनिमित्त बाहेर जाणारा नोकरदार वर्गाचे फार मोठे हाल झाले. बाहेर निघून आलेल्या लोकांनी मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसून कामावर जाणे पसंद केले. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे संपामुळे हाल झाले.

देवरुख एसटी आगारात 162 चालकांपैकी 34 चालक व 146 वाहकांपैकी 18 वाहक यांनी आपली ड्युटी बजावली. सावंतवाडी आणि ठाणे या गाड्या रवाना झाल्या. काही लोकल फेर्‍या करण्यात आल्या.कार्यालयीन कर्मचारी 31 पैकी 15 हजर होते तर कार्यशाळेतील 49 पैकी 5 कर्मचारी हजर होते.

देवरुख आगारातील संपामुळे साखरपा संगमेश्वर माखजन या विभागातही शुकशुकाट जाणवला. ग्रामीण भागातील लोक देवरुख संगमेश्वर, साखरपा भागात न आल्याने बाजारपेठाही ओस पडल्या. संपामुळे खाजगी वाहनांनी माञ जोर मारल्याचे चित्र दिसत होते. एसटी खररोखरच खाजगीकरणाकडे वळणार की काय? असाही सवाल प्रवासी जनतेतून उमटत होता. दहावीचा निकाल जाहीर होत असताना ग्रामीण भागातील मुलांना निकाल पाहण्यासाठी शहरात येता आले नाही.  निकाल पाहण्यासाठी या मुलांना नेटसाठी कसरत करावी लागली. एसटी संपामुळे एकंदरीतच बाजारपेठांचे आर्थिक गणित मात्र बिघडले. देवरुख पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.