Thu, Jul 18, 2019 06:45होमपेज › Konkan › रशियन वधू-वरांचे हर्णैत शुभमंगल सावधान

रशियन वधू-वरांचे हर्णैत शुभमंगल सावधान

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 9:01PMहर्णै : वार्ताहर

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ब्रँडचा जगभरात प्रचार-प्रसार करण्याचा सपाटा लावलेला असताना त्याची फळं आता गावोगाव अनुभवास येऊ लागली आहे. भारतातील पर्यटनाला प्रामुख्याने या ब्रँड डेव्हलपमेंटचा फायदा झाला असून येथील प्रत्येक गोष्टींबाबत परदेशी पर्यटकांना आकर्षण वाटू लागलेलं आहे. हर्णै शेतवाडी येथे रशियन विवाहित जोडप्याने केलेले लग्न त्याचेच द्योतक सध्या ठरत आहे. ही रशियन तरूण मंडळी दरवर्षी हर्णै परिसरात फिरायला येतात.

एका कोळ्याच्या घरी ही मंडळी उतरतात. यामध्ये एक तरूण विवाहित जोडपेही असते. या हंगामात लग्न असल्याने त्यांना दरवर्षी कोळी समाजातील लग्नाचा आनंद सोहळा जवळून पहायला मिळत असतो. यंदा तसे लग्न करायची इच्छा या मंडळींतील जोडप्याने यजमान कोळी कुटुंबीयांकडे व्यक्त केली. सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने यजमान कोळी कुटुंबीयांनीही तयार मंडपांमध्येच त्यांचे लग्न करता येईल, असे सांगितले. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक भटजी आणि वाजंत्री यांचीही रशियन कुटुंबीयांशी गाठभेट घालून लग्नसोहळ्याचा बेत आखण्यात आला.

रशियातून आलेल्या या पाचजणांमधील एकाने मुलाच्या वडिलांची भूमिका बजावली तर कन्यादान करण्यासाठी एक स्थानिक कोळी बांधवच मुलीच्या मामाच्या भूमिकेसाठी तयार झाला. त्यानंतर रशियन वधूवरांना मुंडावळ्यासह विवाहाला साजेसा पोषाख घालण्यात आला. सर्व मित्र मैत्रिणींनीही कोळी समाजाप्रमाणे साड्या आणि पारंपरिक पेहराव केला होता. वैदिक पद्धतीने दीड तास चाललेल्या या लग्नसोहळ्यात कोळी समाजातील लोकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ठरल्यानुसार सप्तपदी, मंगलाष्टकं झाली. सर्वांनी ‘शुभमंगल सावधान’ म्हणत या रशियन जोडप्यांवर अक्षताही टाकल्या. त्यानंतर एका घोड्यावरून नव वधूवरांची वरातही निघाली. सर्वांनी हा कार्यक्रम खूप आनंदाने पार पाडला.

 हा सोहळा अभिमानाने सर्वांना सांगावा असा झालेला असताना त्याची नकारात्मक चर्चा काही नतद्रष्टांनी पसरविण्यास सुरू केली. त्यातून यजमानांना या प्रकरणात काही त्रास होईल अशा भीतीची चर्चाही बंदरात करण्यात आली. मात्र हर्णैवासियांनी दिलेला पर्यटनातील नवा आदर्श व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून घराघरांत पोचला आणि सोने चमकल्याशिवाय राहत नाही, याचा दाखला देत हर्णैवासियांची ही कामगिरी सर्वांकडून शाबासकीची थाप मिळविणारी ठरली.