Wed, Apr 24, 2019 11:59होमपेज › Konkan › चिपळुणातील ग्रामीण रस्त्यांची चाळण

चिपळुणातील ग्रामीण रस्त्यांची चाळण

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 10:48PMचिपळूण : वार्ताहर

गणेशोत्सवापूर्वी कोकणातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणेच्या बैठका दरवर्षी होतात. प्रमुख मार्गावर जुजबी डागडुजी करून गणेशभक्‍तांचे समाधान केले जाते. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्षच होत आहे. चिपळूण तालुक्यातील मोरवणे-निरबाडे रस्त्यासह अन्य रस्तेही डागडुजीच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या वर्षभरापूर्वी राज्यभर रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न प्रकर्षाने पुढे आला. त्यानंतर शासनाकडून राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत ठोस आश्‍वासनही देण्यात आले. त्यानुसार प्रमुख मार्गांची डागडुजी झाली. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्थानिक लोकप्रनिधींनी शब्दही काढलेला नाही. वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील रस्ते डागडुजीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी पावसामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट होऊन खड्ड्यांचे रूपांतर छोट्या तळ्यामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. डागडुजीअभावी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली पहायला मिळते.रस्तोरस्ती खड्डे, रस्त्यालगतची न तोडलेली झाडी, खचलेल्या साईडपट्ट्या, डोंगर उतारावरून येणारी पाणी मिश्रित मातीचा  राप मोरीत अडकत आहे. यामुळे रस्त्यावर पाणी येते. अशा सार्‍यात अनेक ठिकाणी वाहून गेलेले रस्ते अशी विचित्र अवस्था रस्त्यांची आहे.चिपळूण तालुक्यातील मोरवणे ते निरबाडे खिंड, नांदिवसे-वाकरीवाडी, मूर्तवडे-कातकरी, वहाळ ते वीर आदी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. सती ते अडरे मार्गावर अनेक खड्डे पडले पडले आहेत.