Wed, Jul 24, 2019 06:44होमपेज › Konkan › वैभववाडी ग्रामीण रुग्णालय नावापुरतेच!

वैभववाडी ग्रामीण रुग्णालय नावापुरतेच!

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:37PM

बुकमार्क करा
 

वैभववाडी : मारुती कांबळे .

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची असलेली रिक्‍त पदे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच क्ष किरण तंत्रज्ञ ही पदे न भरल्याने  प्रयोगशाळा व क्ष किरणचे अत्याधुनिक मशीन अशी लाखो रुपयांची यंत्र सामुग्री धुळखात पडली आहे. तसेच तालुक्यातील गोरगरीब जनतेला या आरोग्य सेवेसाठी कणकवली किंवा कोल्हापूरला जावे लागत  असल्याने जनतेला नाहक शारीरिक, मानसिक त्रासा बरोबरच आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागत आहे.  तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्येेकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनीधींचे अशी अवस्था आहे.

वैभववाडी तालुका निर्मिती नंतर सुमारे 18 वर्षांनी म्हणजेच 1999 साली ग्रामीण रुग्णालयाची उभारणी झाली. मात्र, हे ग्रामीण रुग्णालय सुरुवातीपासूनच विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी, डॉक्टर्स व सुविधा पुरविण्यात प्रशासनाने नेहमीच आखडता हात घेतला आहे. पाच वषार्ंपूर्वी  या रुग्णालयाची  सुसज्ज इमारत बांधण्यात आली.  सुसज्ज प्रयोगशाळा, क्ष-किरण यंत्र आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.   त्यामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, या सेवांसाठी आवश्यक कर्मचारी न नेमल्याने रुग्णालयाची मूळ समस्या कायम राहिली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रिक्‍त पदांचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.  रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोग शाळा आहे.  मात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्‍त असल्यामुळे रुग्णांची रक्‍त तपासणी येथे होऊ शकत नाही.  यासाठी रुग्णांच्या रक्‍ताचे नमुने कणकवली येथे पाठवावे लागतात किंवा अत्यवस्थ  रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी लॅबमधून रक्‍त तपासणी करुन घ्यावी लागते. यासाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेली दहा वर्षे हे पद रिक्‍त असल्याने प्रयोगशाळा विनावापर पडून आहे. तिच अवस्था क्ष किरण तंत्रज्ञ पदाची आहे.  रुग्णालयाच्या निर्मितीपासून म्हणजे 1999 पासून हे पद रिक्‍त आहे.  रुग्णालयात सुमारे 2 ते 3 लाख रुपये किंमतीची एक्सरे मशीन सन 2014 बसविण्यात आली आहे.  मात्र एक्सरे टेक्नीशीयन पद रिक्‍त असल्यामुळे लाखो रुपयांचे हे मशीन गेली  चार वर्षे धूळखात पडली आहे.  रुग्णालयात या दोन सुविधा उपलब्ध झाल्यास तालुक्यातील गोरगरीब जनतेला त्याचा लाभ होणार आहे.  

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्‍त पदांचाही आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सध्या तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी यातील एक वैद्यकीय अधीक्षक हे रुग्णालयात हजर राहात नाहीत. ते स्त्रीरोग तज्ज्ञ असूनही त्याचा लाभ रुग्णांना होत नाही.  त्यामुळे सध्या दोनच वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारी यांची रिक्‍तपदे भरावीत, अशी मागणी  होत आहे.