Mon, Sep 24, 2018 18:54



होमपेज › Konkan › रत्नागिरीसह 3 विमानतळ विकासासाठी 96 कोटी

रत्नागिरीसह 3 विमानतळ विकासासाठी 96 कोटी

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:41PM



नागपूर : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी, कोल्हापूर आणि चंद्रपूर विमानतळांच्या विकास कामासाठी 96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली. शिवसेनेचा विरोध असतानाही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आमदारांनी ग्रामीण भागात सुचविलेल्या विकास कामासाठी एक हजार कोटी तसेच नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या अनुदानापोटी 546 कोटी, महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांसाठी 190 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या अधिवेशनातही हजारो कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्याची परंपरा कायम ठेवली. मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या तूर खरेदीसाठी दिलेल्या शासन हमीवर घेतलेल्या कर्जाची रक्‍कम एकरकमी परतफेड करण्यासाठी 1 हजार 528 कोटी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 769 कोटी तर 50 कोटी वृक्ष लागवडीसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांवर 9 आणि 10 जुलै रोजी सभागृहात चर्चा होणार आहे.बालके, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी आहार योजनेसाठी 500 कोटी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी अतिरिक्‍त तरतूद म्हणून 493 कोटी, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी 203 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्‍तींच्या हवाई प्रवासाकरिता सरकार दोन हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी 159 कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अंशदान म्हणून 100 कोटी, भीमा- कोरेगाव दंगलीतील बाधितांसाठीही आठ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.