Mon, Jun 24, 2019 21:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आचर्‍याचा पारंपरिक 'रोंबाट' उत्सव(Video) 

सिंधुदुर्ग : आचर्‍याचा पारंपरिक 'रोंबाट' उत्सव(Video) 

Published On: Mar 02 2018 4:16PM | Last Updated: Mar 02 2018 4:16PMआचरा : उदय बापर्डेकर

गावात रात्री देवहोळी घेऊन येणाऱ्या ताशांचो आवाज कानी पडलो आणि आवारात बोंब उठली. उडालो रे उडालो,....आकाश कंदील उडालो...आणि खायल्यांचो बाबलो चिकलात बुडालो... येणार रे..... येणार आम्ही म्हणतव येणार ....आणि बाबल्याक काढा शेणार ....!मालवणी बोली भाषेत अस्सल हेल काढत आणि वेगवेगळे आवाज काढत एकापाठोपाठ एक उठणाऱ्या बोंबा शिमग्याचा उत्साह वाढवत होत्या. वर्षभर मनात साठलेली मळभ या होळी उत्सवाच्या निमित्ताने बाहेर पडत होती.

आचरे गावच्या संस्थान कालीन होळी उत्सवाला पारंपरिक 'रोंबाट' कार्यक्रमाने गुरूवारी प्रारंभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या होळी उत्सवानिमित्त इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरत व रवळनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. या कालावधीत मंदिराजवळील मांडावर होणारे शिमग्याचे खेळ, सोंगा हे प्रमुख आकर्षण असते. आचरा गावचा प्रत्येक उत्सव हा संस्थानकालीन थाटाचा असतो. होळी उत्सव याला अपवाद नाही. पुरातन काळापासून साजरा होणारा होळी उत्सव आजही ग्रामस्थ त्याच पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करतात. होळी दिवशी रात्री श्री देव रामेश्वर मंदिराजवळ देव होळी उभारली जाते. तर दुसऱ्या दिवशी आचरा बाजार पेठेनजीक गाव होळी उभी केली जाते. या दोन्ही होळीसाठी पोफळीच्या झाडांचा वापर केला जातो. परंपरेनुसार देव होळीसाठी झाड लगतच्या वायंगणी गावातून सवाद्य मिरवणुकीने आणले जाते. तर गाव होळी ही सरजोशी घराण्याकडून बाजार पेठेतून मिरवणुकीने आणली जाते.

पोफळीच्या तोडलेल्या खोडाला आम्रवृक्षाची पाने लपेटून व शेंड्याला भगवा ध्वज उभारून होळी उभी केली जाते. त्यानंतर तीची पुजा अर्चा केली जाते. नवस बोलणे, फेडणे कार्यक्रम होतात. त्यानंतर ग्रामस्थांमधून दोघांना नवरा-नवरीचे सोंग घेवून गावात रोंबाट काढले जाते.

आजच्या या रोंबाटात गावातील अबालवृध्द सहभागी झाले होते. रोंबाट मिरवणुकी दरम्यान गावात ग्रामस्थांनी रंगपंचमीचाही आनंद लुटला. ही मिरवणूक रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून श्री गांगेश्वर मंदिरात विसर्जित झाली. पुढील तीन दिवस रवळनाथ मंदिर येथे व शेवटच्या दिवशी श्रीदेव रामेश्वर मंदिरात मांड भरविण्यात येतो. तिथे रात्री वर्षभरातील घडलेल्या घटनांवर आधारित विविध प्रकारची पारंपरिक सोंग आणली जातात.