Wed, Jul 24, 2019 12:56होमपेज › Konkan › इन्सुलीत आणखी एक बंद बंगला फोडला

इन्सुलीत आणखी एक बंद बंगला फोडला

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:45PMबांदा : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेंब येथील आणखी एक बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. नोकरीसाठी मुंबईत राहणार्‍या लक्ष्मण राजाराम कोरगावकर यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला. त्यांच्या घरातून नेमके काय चोरीस गेले ते समजू शकले नाही. रविवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रल्हाद पाटील आणि ठसे तज्ञांनी चोरी झाल्या ठिकाणचा तपास सुरू केला. तर या भागात फिरणार्‍या अनोळखी माणसांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. या भागात गस्त वाढवा अशा सूचना बांदा पोलिस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांना दिल्या आहेत.

इन्सुली येथील विकास ज्ञानदेव केरकर यांच्या राहत्या घरात शनिवारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यात अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.  तर त्यांच्या घरापासून अगदी गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मण कोरगावकर यांच्या बंद घराच्या मागच्या बाजूने खिडकीचा लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी आतील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. 

लक्ष्मण कोरगावकर हे मुंबईत वास्तव्यास असून त्यांच्या घराची देखरेख त्यांचे नातेवाईक महादेव परब हे करतात. ते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री लाईट चालू करून आपल्या घरी गेले होते. सकाळी लाईट बंद करण्यासाठी आले असता खिडकीचे गज कापलेले निदर्शनास आले. चोरट्याने मागच्या बाजूच्या खिडकीचे लोखंडी गज कापून बेडरुममध्ये प्रवेश केला. खोलीतील कपाट फोडले व सामान पसरवून टाकले. मात्र कोरगावकर कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असल्याने नेमके काय चोरीला गेले याचा तपशील प्राप्त होऊ शकलेला नाही.  त्यांच्या घरात मौल्यवान वस्तू नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

कोरगावकर यांच्या घराच्या तिन्ही बाजूस घरे असतानाही चोरट्यांनी घर फोडण्याचे धाडस केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. रविवारी सकाळी ठसेतज्ज्ञ महेश पोटफोडे यांनी केरकर यांच्या घरातील दरवाजे, सातही कपाटे, टेबलवरील हाताचे आणि पायाचे ठसे घेतले. त्यानंतर कोरगावकर यांच्या घरच्या खिडकीवरील मिळालेले ठसे घेतले.  बांदा पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर, नागेश गावकर आदी उपस्थित होते. दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रताप पाटील, प्रवीण वालावलकर, एम. एम. राऊत आदींनी दोन्ही चोरीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली.स्थानिक गुन्हा अन्वेषण निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी चोरटे स्थानिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. बांदा पोलिस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांना या परिसरात गस्त वाढवा. तसेच या भागातील राहणार्‍या परप्रांतीय भाडेकरूंची माहिती मागवा. तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासा, अशा सूचना यावेळी दिल्या.