होमपेज › Konkan › सावंतवाडीत पाच बंगले फोडले!

सावंतवाडीत पाच बंगले फोडले!

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 11:54PM सावंतवाडी : शहर वार्ताहर

जिल्ह्यासह  सावंतवाडी तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी  मध्यरात्री  निरवडे-कोनापाल येथील विष्णुसृष्टी कॉलनीतील पाच बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. या बंगल्याचे मालक बाहेरगावी असल्याने हे पाचही बंगले बंद होते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केली. पाच बंगल्यापैकी मोईन मुबारक नाईक यांच्या बंगल्यातील 25 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर उर्वरित चार बंगल्यामध्ये त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

गेल्या आठ दिवसांत ही पाचवी चोरी असून पोलिसांना गुन्हेगारच आव्हान देत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

गेले काही दिवस जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्यात चोरींचे सत्र सुरू आहे. बांदा येथे दोन दिवसांपूर्वी दोन फोटो स्टुडिओंना लक्ष केल्यावर चोरट्यांनी मळगाव, निरवडे परिसराला लक्ष केले. सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील निरवडे-कोनापाल येथे असणार्‍या विष्णूसृष्टी या पॉश कॉलनीला चोरट्यानी लक्ष केले. या कॉलनीतील बहुतेक बंगल्याचे मालक बाहेरगावी असल्याचा फायदा घेत मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच बंगले फोडले. दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आता प्रवेश केल्यावर बंगल्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. मात्र, बंगले बंद असल्याने तसेच बंगल्याचे मालक बाहेरगावी राहत असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

वॉचमनमुळे चोरीचा प्रकार उघड....

विष्णुसृष्टी कॉलनीत एकूण 84 बंगले असून कॉलनीच्या दोन गेटवर वॉचमन ठेवण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या गेटवरील वॉचमन अंकुश जाधव हे सकाळी 7 वाजता कॉलनीतील बंगल्याची नेहमीप्रमाणे पहाणी करण्यासाठी गेले असता, काही बंगल्याची कडी-कोयंडा तोडण्यात आल्याचे  त्यांच्या निदर्शनास आले.हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर वॉचमन जाधव यांनी या प्रकाराची माहिती कॉलनीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांना दिली. कॉलनी अध्यक्ष शेट्ये तसेच निरवडे सरपंच प्रमोद गावडे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेट्ये यांनी हा प्रकार बंगल्यांच्या मालकांच्या कानावर घातल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या चोरीच्या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अरुण सावंत, कॉन्स्टेबल विकी गवस, डी. जी.तेली यांनी घटनास्थळी जात चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथक तसेच ठसे तज्ज्ञाची मदत घेण्यात आली.

चोरटे माहितगार....

या प्रकरणातील चोरटे हे माहितगार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चोरट्यानी कॉलनीच्या पहिल्या गेट समोरील आजूबाजूस असलेल्या पाच बंगल्यात चोरी केली. गेट समोरील एका बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेरात काहीही आढळून न आल्याने हे पाचही बंगले चोरट्यांनी कॉलनीच्या मागील बाजूने प्रवेश करून फोडल्याची शक्यता पोलिसानी व्यक्त केली. या पार्श्‍वभूमीवर चोरटे माहितगार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले काही दिवस सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगरमधील बंगले तसेच राजरत्न कॉम्प्लेक्समधील फ्लॅट फोडण्यात आले होते. या चोरीतील चोरट्यांचा अद्याप पत्ता लागला नसतानाच दोन दिवसांपूर्वी बांदा येथे दोन फोटो स्टुडिओ फोडून चोरी करण्यात आली होती.आता पुन्हा निरवडे येथे पाच बंगले फोडून चोरी करण्यात आल्याने वाढत्या चोरींच्या घटनांवर पोलीस कसे नियंत्रण मिळवणार,असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निरवडे, मळगाव परिसरात मोठया प्रमाणात परप्रांतीय व्यक्ती असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच या परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी केली.