Sat, Apr 20, 2019 23:56होमपेज › Konkan › ‘नदी पुनरूज्जीवन’ उपक्रमाचे खासदारांकडून कौतुक!

‘नदी पुनरूज्जीवन’ उपक्रमाचे खासदारांकडून कौतुक!

Published On: Apr 28 2018 10:59PM | Last Updated: Apr 28 2018 10:54PMकणकवली ः प्रतिनिधी

नाटळ ग्राम विकास मंडळ व ‘नाम’ फाऊंडेशनच्यावतीने नाटळ गावात सुरु असलेल्या ‘नदी पुनरुज्जीवन’ उपक्रमास खा.विनायक राऊत यांनी शनिवारी भेट दिली. प्रत्यक्ष नदीपात्रास भेट देवून त्यांनी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्‍त केले. या उपक्रमासाठी मदत म्हणून त्यांनी तात्काळ 50 हजाराचा धनादेश मंडळाकडे सुपूर्द केला. तसेच शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

जिल्हयातील पहिला ‘नदी पुनरुज्जीवन’ हा महत्त्वाकांशी उपक्रम नाटळ गावात सुरू आहे. ‘नाम’ फाऊंडेशनचे तांत्रिक सहकार्य व नाटळ ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी ‘नाम’चे अध्यक्ष अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. 

शनिवारी दुपारी खा.विनायक राऊत यांनी नाटळ येथे जात या उपक्रमाची पहाणी केली. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथ सावंत, सचिव भालचंद्र सावंत, समीर सावंत यांनी त्यांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

हा उपक्रम स्तुत्य असून गावोगावी असे उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली. या कामासाठी राज्य व केंद्रशासनाकडून कसा निधी उपलब्ध करता येईल, यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मदतीचा धनादेश त्यांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे सुपुर्द केला. शासकीय मदतीसाठी पालकमंत्र्यांकडे लेखी पत्र देण्याची सूचना त्यांनी केली.

खा.राऊत यांनी श्री देव रामेश्‍वराचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. राजवाडी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, शिवसेनेचे शामसुंदर सावंत, जि.प.सदस्य नागेंद्र परब, नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, उपविभाग प्रमुख शामसुंदर परब, नाटळ शाखाप्रमुख स्वप्निल मराठे, ग्रा.पं.सदस्य सचिन सावंत, तसेच बाळा पटेल, अंकुश सावंत, नितीन सावंत, प्रशांत सावंत, शरद सावंत आदी उपस्थित होते.