Sat, Dec 14, 2019 02:22होमपेज › Konkan › पणदूर पंचक्रोशित भातशेती फुलोर्‍यावर!

पणदूर पंचक्रोशित भातशेती फुलोर्‍यावर!

Published On: Sep 16 2018 1:19AM | Last Updated: Sep 15 2018 8:34PMपणदूर ः प्रकाश चव्हाण

पणदूर पंचक्रोशित भातशेती सध्या बर्‍यापैकी  फुलोर्‍यावर आली असल्याचे कृषी विभाग तसेच शेतकर्‍यांचेही म्हणणे आहे. काही तुरळक भागात शेंडे करपा, निळा भुंगा आदी व अन्य रोगाची शेतीत लागण होती. तिथे कृषी विभागाकडून कीटकनाशक फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. खाजगी दुकानात खरेदी केलेल्या काही हायब्रिड बियांण्याची शेतीत भातरोपे किंचित पिवळसर झाल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. या शेतकर्‍यांनी संबंधित वितरक तसेच कृषी विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या पावसाची उघडीप आहे. शेतकर्‍यांची शेतकामे उरकलेली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भात शेती बर्‍यापैकी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून उमटत आहेत. त्याला कृषी सहाय्यकांकडून दुजोरा मिळत आहे. पणदूर पंचक्रोशीत पणदूर, वेताळबांबर्डे, हुमरमळा,अणाव आदी भागात पाणथळ तसेच भरडी शेती आहे. हुमरमळा -अणाव भागात पाणथळ भागात भातशेत लागवड भरडीच्या तुलनेत अधिक आहे. पणदूर -वेताळबांबर्डे सज्जात 330 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे तर हुमरमळा -अणाव भागात 95 हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.पंचक्रोशीत खरीप हंगामात स्थानिक प्रकारात मसुरी, वालय, बेळा आदी जाती संकरीत म्हणजेच हायब्रिड जाती 644 प्रो अ‍ॅग्रो तसेच सुधारीत जाती श्री राम गोल्ड, शुभांगी आदी जातीची लागवड करण्यात आली आहे. पाणथळ भागात साडेचार ते पाच महिन्याच्या कालावधीचे महान जातीचे वाणही करण्यात आले आहे. हुमरमळा -अणाव भागात काही तुरळक क्षेत्रात शेंडे करपा, निळे भुंगे,गादी माशी या रोगाची लागण आहे. त्या भागाचा सर्व्हे कृषी विभागाकडून करण्यात आला असून कीटकनाशक फवारणीचा संबंधित शेतकर्‍यांनी सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उघडीपीमुळे शेतकरी चिंतेत

चालू वर्षी पावसामुळे पणदूर पंचक्रोशीतील भातशेती चांगल्या प्रकारे बहरलेली दिसून येत आहे. गेले चार-पाच दिवस पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असून कडक उन्हाचा मारा भातशेतीवर पडत आहे. आताच्या स्थितीत कडक ऊन भातशेतीला अधिक प्रमाणात धोक्याचे असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात असून या वाढत्या उन्हामुळे बहरलेल्या शेतीचे नुकसान होते की काय? याची शेतकर्‍यांना चिंता सतावू लागली आहे.