Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Konkan › जिल्हाधिकार्‍यांकडून निवडणुकीचा आढावा

जिल्हाधिकार्‍यांकडून निवडणुकीचा आढावा

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 10:57PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी  

कणकवली नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी कणकवली नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे व निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

या निवडणुकीसंबंधी जिल्हाधिकारी यांनी आज सर्व संबंधीत अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शस्त्रात्रे जमा करणे, निवडणुकीचा कर्मचारी वर्ग, मतदान केंद्र, त्यांची व्यवस्था, तसेच वाहतूक व्यवस्था याविषयी सविस्तर आढावा घेतला. 

या निवडणुकीसाठी अधिग्रहीत 17 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मतदान केंद्रातील व्यवस्था, पेड न्यूज बाबत स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, आत्मसंरक्षण तसेच इतर कारणास्तव घेतलेल्या शस्त्रांची तपासणी करून निवडणूक कालावधीपर्यंत शस्त्रे जमा करुन घेणे, ध्वनिक्षेपकांचा वापर, सभा बैठकांबाबत नियमानुसार परवानग्या देणे याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर सूचना केल्या. वेब कास्टींक यंत्रणा बसविण्याविषयी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळीदिल्या.

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आयकर अधिकारी अजय पवार, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी कणकवली अवधूत तावडे, तहसीलदार वैशाली माने, सहाय्यक विक्रीकर आयुक्‍त अंजली देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर,  पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, नगरपरिषद प्रशासन अधिकारी संतोष जिरगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.