Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Konkan › कदमांनी घेतला विकासकामांचा आढावा

कदमांनी घेतला विकासकामांचा आढावा

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:53PMखेड : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, खेड, दापोलीतील पंचायत समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, नायब तहसीलदार मंगेश आंबेकर, गटविकास अधिकारी गुरूनाथ पारसे, खेड, दापोली, मंडणगडमधील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यात सरोवर संवर्धन अंतर्गत विविध कामांना मंजुरी देऊन देखील आठ महिन्यांत ती सुरू होऊ शकलेली नसल्याबद्दल ना. कदम यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावेळी ना. कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळपाणी योजनांचा आढावा घेतला. या योजना लवकरात लवकर पूर्ण होतील, या द‍ृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभाग यांना दिल्या.

यावेळी ना. कदम म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात 25-15 अंतर्गत प्राप्त झालेला निधी खर्च न होता शासनाकडे परत जात आहे. तसे होऊ न देता जी कामे पूर्ण झाली आहे त्यांची बिले संबंधितांना अदा होऊन कामांना गती मिळेल यासाठी सर्वच अधिकार्‍यांनी प्रयत्न करा. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा करून रत्नागिरी जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या सर्वच नळपाणी योजनांच्या प्रस्तावांना कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. या योजनांची कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. विशेषतः खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांसाठी राष्ट्रीय पेयजलमधून 177 कामे मंजूर झाली असली तरी अन्य ज्या ठिकाणी योजनांची दुरूस्ती अथवा नवीन योजना अपेक्षित आहेत. याची माहिती संबंधित विभागाने कळवल्यास त्या योजनांनादेखील मंजुरी मिळवता येऊ शकेल.

पाणीटंचाई निवारणासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत चर्चा करून केंद्रातून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येत असून त्यातून कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय पेयजल प्रमाणेच पर्यावरण मंत्रालयातील सरोवर संवर्धन योजनेची कामेदेखील गतीने सुरू होणे अपेक्षित आहे. राज्यात इतर ठिकाणी सरोवर संवर्धनची कामे सुरू झाली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात कामांना मंजुरी व निधी देऊनही आठ महिने उलटून देखील कामे सुरू होऊ शकलेली नाहीत याची खंत वाटते, असे ना. कदम यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी जबाबदारीने कामे लवकरात लवकर पूर्ण करण्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या.