Mon, Apr 22, 2019 06:00होमपेज › Konkan › रत्नागिरी ‘प्रभाग 3-ब’ च्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

रत्नागिरी ‘प्रभाग 3-ब’ च्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:27PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी शहराच्या प्रभाग क्र. 3 ‘ब’च्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे गुरूवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या आत स्पष्ट होणार आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात ही मतमोजणी सुरू होणार आहे. खरी लढत सेनेचे राजन शेट्ये व भाजपचे वसंत पाटील यांच्यातच आहे. गेल्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर भाजपने फटाके फोडले. त्याचवेळी सेनेच्या वतीने विजयाची खात्री देण्यात आली.

प्रभाग क्र. 3 ‘ब’च्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या शुक्रवारी मतदान झाले. सेनेचे राजन शेट्ये, भाजपचे वसंत पाटील व राष्ट्रवादीचे सनिफ गवाणकर हे तीन उमेदवार आहेत. एकूण 3335 मतदारांसाठी 3 मतदान केंद्रे आणि 3 इलेक्ट्रॉनिक मशिन होत्या. तीनही केंद्रांवर 1908 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. हे 57.21 टक्के इतके मतदान झाले असून गुरूवारी मतमोजणी होणार आहे. तीनच मशिनमधील मतमोजणी असल्याने अवघ्या 20 ते 30 मिनिटांत निकाल स्पष्ट होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

मतदान झाल्यानंतर भाजपला विजयाचा विश्‍वास वाटल्याने फटाके फोडले. दुसरीकडे काही झाले तरी 1 हजार मते मिळून आपणच विजयी होणार अशी खात्री सेनेच्या राजन शेट्ये यांनी त्यावेळी व्यक्‍त केली. दोघांनाही विजयाची खात्री असली तरी एकच उमेदवार यशस्वी होणार आहे. तो यशस्वी उमेदवार कोण हे गुरूवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. सेना, भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांची सर्व माहिती फलकांवर

या पोटनिवडणुकीच्या तीनही मतदान केंद्रांवरील प्रवेशद्वारांवर तीनही उमेदवारांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. या फलकावर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, जंगम स्थावर मालमत्तेसह गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, ही निवडणूक सेना-भाजपच्याद‍ृष्टीने प्रतिष्ठेची असल्याने मतमोजणीवेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Tags : Konkan, Result,  re election,  Ratnagiri