होमपेज › Konkan › देऊड-चिंचवाडीवासीयांचा प्रश्‍न सोडवा

देऊड-चिंचवाडीवासीयांचा प्रश्‍न सोडवा

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:25PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपूर्वी जयगड-डिंगणी रेल्वे मार्गावरील देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन देऊनही टोलवाटोलवी करणार्‍या रेल्वे प्रकल्प व्यवस्थापकांना जिल्हा प्रशासनाने उचित कार्यवाही करून ग्रामस्थांना रेल्वे काम बंद आंदोलनापासून परावृत्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

जयगड-डिंगणी मार्ग बहुतांश बोगद्यातून जात असून या मार्गावरील प्रकल्पग्रस्तांना सुरुवातीपासूनच अंधारात ठेवण्याचे कृत्य या प्रकल्पाच्या अधिकार्‍यांकडून होत आहे. कोकण रेल्वेशी संबंधित हा रेल्वे मार्ग असताना प्रकल्पग्रस्तांना रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. कोकण रेल्वेने प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त नोकरीत सामावून घेण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र, या मार्गावरील प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

या मार्गावर बोगदे काढताना पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. अशाच प्रकारची स्थिती देऊड येथे आहे. येथील चिंचवाडीमध्ये 26 घरांना रेल्वे बोगद्यामध्ये होत असलेल्या प्रचंड स्फोटामुळे घरांना तडे जात आहेत. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प आहे. बोगदा खोदताना किती क्षमतेचे सुरूंग वापरावयाचे, यावर कोणाचेच नियंत्रण नाही. जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्प अधिकार्‍यांनी सुरूंग स्फोटामध्ये चिंचवाडीतील घरांना तडे गेल्यामुळे प्‍लास्टर करून देतो, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तडे गेलेल्या फटी सिमेंटद्वारे भरून प्रकल्प अधिकार्‍यांनी असंवेदनशीलता दाखवली आहे. चिंचवाडी ग्रामस्थांची पाण्याच्या ओढ्याकडे 

जाणारी वाट बंद करण्यात आली आहे. ही वाट सुरू करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीच सकारात्मक भूमिका प्रकल्प विकसकांकडून घेतली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्‍त होत होती.विविध मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने आणि अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवी सुरू असल्याने ग्रामस्थांनी काम बंद आंदोलनासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यांनी याबाबत उचित तोडगा काढण्याचे आदेश रेल्वे प्रकल्प व्यवस्थापकांना दिले आहेत.

निसर्गाची अपरिमित हानी

देऊड-चिंचवाडी येथील बोगद्याच्या खाली असलेल्या आंबा बागेमध्ये बोगद्यातून आलेले दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे बारमाही वाहणारी नदी भरून गेली आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद केल्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे.