Mon, Mar 25, 2019 14:01होमपेज › Konkan › केरळीयनांची अनधिकृत घरे तोडण्याचा ठराव

केरळीयनांची अनधिकृत घरे तोडण्याचा ठराव

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:41PMबांदा ः वार्ताहर

घारपी गावातील सामाईक जमिनीत केरळीयनांनी केलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात ग्रामसभेत तीव्र पडसाद उमटले. या अनधिकृत घरांना ग्रा.पं.जबाबदार असून ग्रामसेवक केरळीयनांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. केरळीयनांची अनधिकृत घरे तत्काळ जमीनदोस्त करावीत, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत शिक्क्यांवर घारपीचा उल्लेख नसल्याने प्रशासकीय कामांमध्ये येणार्‍या अडचणींबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी विविध विषयांवरुन ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात खडाजंगी झाल्याने ग्रामसभा वादळी झाली.

घारपी येथील माऊली मंदिरात फुकेरी-घारपी-उडेली ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सावित्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसरपंच सौ. जानकी गावडे, ग्रा.पं.सदस्य अमित गवस, गौरी गावडे, बाबू आईर, पोलिस पाटील महेश आईर, ग्रामसेवक सोमनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते.

ग्रामसभेत शासकीय निधी फुकेरी व घारपी गावात समसमान खर्च करण्यात यावा,अशी मागणी शिवराम गावडे यांनी केली. निधी खर्च करताना घारपी गावाला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. चौदाव्या वित्त आयोगाचा 100 टक्के निधी खर्च झाल्याचे ग्रामसेवक वाघमोडे यांनी सांगितले. मात्र आराखड्यातील कामे निधीअभावी अद्यापही अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

फुकेरी ग्रुप ग्रा.पं.मध्ये घारपी गावाचा समावेश असूनही शिक्क्यांवर केवळ फुकेरी गावाचाच उल्लेख आहे. फुकेरी गाव हे दोडामार्ग तालुक्यात येते. तर घारपी हे गाव सावंतवाडी तालुक्यात येत असल्याने घारपी ग्रामस्थांना प्रशासकीय कामे करताना अडचणी निर्माण होतात याकडे लक्ष वेधण्यात आले. यासाठी शिक्क्यांवर घारपी गावाचा उल्लेख करावा असा ठराव घेण्यात आला.फुकेरी व घारपी गावांचे भौगोलिकदृष्ट्या अंतर हे दूरचे आहे. घारपीवासीयांना दाखल्यांसाठी फुकेरी येथे जाण्यासाठी सुमारे 7 कि.मी. पायपीट करावी लागते. ही पायवाट झाडाझुडपांनी वेढली असल्याने या पायवाटेवरील झुडपांची तातडीने सफाई करण्याची मागणी करण्यात आली.

घारपी गाव हे सावंतवाडी तालुक्यात येत असल्याने या गावाचे विभाजन करून स्वतंत्र महसूली गाव करावे अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. गावातील 102 एकर क्षेत्र हे ग्रा.पं.च्या अखत्यारीत असून या जमिनीवर केरळीयनांनी  बागा केल्या आहेत. यावर ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. ग्रा.पं.ने याबाबत कोणती कारवाई केली?असा सवाल उपस्थित केला. यावर ग्रामसेवक वाघमोडे यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ आक्रमक होत परप्रांतीयांची ग्रामसेवक पाठराखण करत असल्याचा आरोप करत धारेवर धरले.दीपक गावडे, आना गावडे, हरी गावडे, अजय गावडे, महेश नाईक यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामसभेसाठी 139 ग्रामस्थ उपस्थित होते.