Sun, Nov 18, 2018 13:25



होमपेज › Konkan › देवगड आमसभेत नाणार रिफायनरीविरोधात ठराव

देवगड आमसभेत नाणार रिफायनरीविरोधात ठराव

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:33PM



देवगड : प्रतिनिधी

विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच, अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा विरोधाचा महत्त्वपूर्ण ठराव देवगडचा आमसभेत घेण्यात आला. हा प्रकल्प देवगडमध्ये नकोच.याबाबत आम्ही कोणाशीही चर्चा कराणार नाही व कुणाला करायलाही देणार नाही अशी भूमिका आ. नीतेश राणे यांनी मांडली. आमसभेत बीएस्एन्एलच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त करत बीएस्एन्एलच्या निषेधाचा ठराव घेण्यात आला.

देवगड पंचायत समितीची आमसभा आ. नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडली. जि.प.अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, बांधकाम सभापती  संतोष साटविलकर, देवगड सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवरूखकर, तहसीलदार वनीता पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,  पोलिस निरिक्षक सुधीर शिंदे, माजी अ. अ‍ॅड.अजित गोगटे, जि.प. व पं.स.सदस्य उपस्थित होते.

आमसभेत गिर्ये-रामेश्‍वर येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर व रिफायनरी विरोधकांनी प्रकल्पा विरोधात तीव्र भुमिका मांडली. या प्रकल्पामुळे जनता विस्थापित होणार असून हा विनाशकारी प्रकल्प आमच्या परिसरात नकोच! अशी मागणी करत तसा ठराव मांडला.  आ. नितेश राणे यांनीही या भूमिकेला पाठींबा दर्शवत या प्रकल्पाबाबत आता कोणाशीही चर्चा करायची नसून हा प्रकल्पच येथे नकोच असा पुनरुच्चार केला व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

दूरसंचारच्या कारभाराबाबत  तीव्र संताप
देवगड तालुक्यात बीएस्एन्एल्ची सेवा पूर्णपणे खालावली असल्याचे सांगत आ. राणे यांनी बीएस्एन्एल्च्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बीएस्एन्एल् विरोधात  तक्रारी व समस्येचा पाढा उपस्थित नागरिकांनी वाचला.एकीकडे केंद्र व राज्यशासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात असताना नेटवर्क नाही, लँडलाईन वारंवार बंद या तक्रारींचे निराकारण होत नाही हे संतापजनक असून बीएस्एन्एल्च्या कारभाराचा निषेधाचा ठराव यावेळी घेण्यात आला.गणेशोत्सवापूर्वी सेवा सुरळीत करण्याच्या सूचना आ. राणे यांनी बीएस्एन्एल्च्या अधिकार्‍यांना दिल्या.

गिर्येत अवैध दारूधंद्याना ऊत, पोलिसांचा वरदहस्त
गिर्ये गावातील अवैध दारूधंद्याचा विषय आमसभेत चांगलाच गाजला.पोलिस अवैध दारूधंद्यावर कारवाई करीत नाहीत, असा आरोप गिर्ये सरपंच रूपेश गिरकर यांनी केला. तर पोलिसच दारूविक्रेत्यांकडून हप्ते घेवून कारवाई करण्याअगोदर दारू विक्रेत्याला कल्पना देतात, असा गंभीर आरोप मुनाफ ठाकूर यांनी केला. यावर दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाते मात्र तेथिल स्थानिकांकडूनही पोलिसांना सहकार्य हवे ,असे मत स.पो.निरिक्षक कोळी यांनी मांडले.

शिधापत्रिकेवर नाव दाखल करण्यासाठी असलेली उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केली.जामसंडे- पीरवाडी येथील नागेश बांदकर यांच्या घरी लग्नसमारंभावेळी त्यांचा घरातील विद्युतपुरवठा बंद करणार्‍या वायरमनवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केली. पडेल पंचक्रोशीतील गावांना जामसंडे सबस्टेशनवरून वीजपुरवठा करावा अशी सुचना पडेल सरपंच विकास दीक्षित यांनी मांडली. ग्रा.पं.संगणक ऑपरेटर्सना पगार वेळेवर होत नाही याकडे प्रमोद शेठ यांनी लक्ष वेधले.आनंदवाडी प्रकल्पाला चालना द्यावी अशी सुचना काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी मांडली.

‘मग्रारोहयो’ विषय गाजला
मग्रारोहया कामांबाबत फक्‍त फणसगाव,उंडील, विठ्ठलादेवी, गोवळ, वाघिवरे या पाच ग्रामपंचायतीसाठी राजकारण करून कामांची चौकशी करण्यात आली.यामागे राजकीय षड:यंत्र आहे, असा आरोप फणसगांवचे माजी सरपंच उदय पाटील व कृष्णा नर यांनी केला. मग्रारोहयोच्या देवगड तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करावी अन्यथा कामे सुरू करू नयेत असा पवित्रा घेतला. या बाबत आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घ्यावी अशी सुचना संदीप साटम यांनी केली.

मिठमुंबरी- बागवाडी रस्ता विषयावरून बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. तारामुंबरी पुलाचे जोडरस्ते व बागवाडी येथील रस्त्याचा डांबरीकरणासाठी  10 कोटी रूपये मंजुर झाले.भुसंपादनासहीत रस्ता डांबरीकरणासाठी 10 कोटी रूपये मंजुर होते. रस्ता 5 कोटींमध्ये होवू शकतो मग भूसंपादनाचे 5 कोटी गेले कुठे ? असा सवाल विलास साळसकर यांनी केला. तिर्लोट येथील सुबय्या साकवाचे काम डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सुचना आ. राणे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.देवगड पवनउर्जा प्रकल्पाला स्व. आ. आप्पा गोगटे यांचे नाव देण्याचा विषय  रखडला असून हा देवगडवासियांचा अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी महावितरणला दिल्या.