Fri, Jul 19, 2019 13:41होमपेज › Konkan › प्रलंबित कृषी पंप वीज जोडणीसाठी मोबाईल क्रमांक नोंदवा

प्रलंबित कृषी पंप वीज जोडणीसाठी मोबाईल क्रमांक नोंदवा

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 8:56PMकुडाळ : वार्ताहर

पैसे भरूनही कृषिपंपाना वीजजोडण्या प्रलंबित असणार्‍या शेतकर्‍यांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवावा. या सर्व ग्राहकांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर महावितरणकडे नोंद नाही, अशा ग्राहकांनी त्वरित आपल्या नंबरची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. या प्रलंबित ग्राहकांना या प्रणालीची कार्यवाही कोणत्या टप्प्यात आहे, याची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येणार आहे.

महावितरणद्वारे सर्व प्रकारच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी, वीज जोडणीची सद्यस्थिती, वीज बील व विज बिलांचा भरणा, वीज स्थगितीची सुचना, मीटर रीडिंग इत्यादी माहिती एसएमएस स्वरूपात ग्राहकांना पाठविण्यात येते. सद्यस्थितीत  महावितरणने उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली  ती अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीतील कामे कोणत्या टप्प्यात आहेत तसेच कृषीपंपांना वीज जोडण्या देण्याबाबतची माहिती एसएमद्वारे कळविण्यात येणार आहे. अद्यापही ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केेली नसेल त्यांनी आपली नोंदणी शाखा कार्यालय, टोल फ्री नंबरवर करावी. 

सद्यस्थितीत प्रचलित पद‍्धतीनुसार  कृषी पंपांना मोठ्या प्रमाणात  विजेचा  वापर करण्यात येतो. या पध्दतीमुळे एकाच रोहित्रावरून 5 ते 20 कृषी  पंपांना  वीजपुरवठा करण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीची लांबी  वाढते त्यामुळे कृषी पंपांना  कमी दाबाने वीजपुरवठा मिळणे, रोहीत्र वारंवार  बिघडणे, वीजपुरवठा खंडीत होणे, वीजहानी वाढणे, वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करणे अशा अडचणींना महावितरणला सामोरे जावे लागत आहे. या सर्व अडचणी कायमचे सोडवून राज्यातील शेतकर्‍यांना चांगल्या दाबाचा अखंडित  वीजपुरवठा   यासाठी ही  नवीन प्रणाली कार्यान्वित  करण्यात येणार आहे. यासाठी वीजभारानुसार विविध क्षमतेचे  रोहीत्र उभारण्यात येवून एका रोहित्रावरून एक किंवा दोन शेतकर्‍यांना वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांनी तातडीने आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनी दिली आहे.