Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Konkan › ‘सीआरझेड’ बदलाने धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

‘सीआरझेड’ बदलाने धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 10:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सागरी नियमन क्षेत्रात (सीआरझेड) निकषातील बदल जिल्ह्यातील सागरी किनार्‍यांच्या धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीच्या पथ्यावर पडले असून रत्नागिरी पतन विभागाला हे बंधारे दुरुस्त करण्याची परवनगी मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात मिर्‍या, काळबादेवी, आरेवारे  आणि मिरकरवाडा बंदरातील धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे. 

‘सीआरझेड’च्या निकषात केंद्र शासनाने बदल करताना बांधकामाची आणि लोकवस्तीची मर्यादा 500 मीटरवरून 50 मीटरवर आणण्यात आली. त्यामुळे गेली अनेक वर्षे लालफीतीत अडकलेल्या जिल्ह्यातील सागरी किनार्‍यांच्या धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीला परवानगी मिळाली आहे. रत्नागिरी पतन विभागाकडून यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  या बंधार्‍यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील नव्याने प्रस्तावित मिर्‍या, काळबादेवी, आरेवारे, मिरकरवाडा यासह  सोमेश्‍वर, वरवंडे, पोमेंडी, जुवे, दापोली तालुक्यातील पाजपंढरी, कर्दे, पडाळे, उटंबर, आंजर्ले, खेड खाडीकिनारा आदी बंधार्‍यांचा समावेश आहे.

‘सीआरझेड’ अधिनियमनानुसार समुद्रकिनार्‍यापासून 500 मीटर अंतराच्या आत कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास प्रतिबंध केल्याने नवीन बांधकामे व दुरुस्तीची कामे करणे अडचणीचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची दुरुस्ती आणि नवे प्रस्ताव ‘सीआरझेड’मुळे रखडले होते. त्यामुळे नव्याने प्रस्तावित बांधकामे रद्द करण्यात आली होती. तर दुरुस्तीचे प्रस्तावही रखडले होते. धूपप्रतिबंधक बंधारे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

पावसाळ्यात उद्भवणार्‍या उधाणाच्या काळात हे बंधारे लोकवस्तीच्या सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे होते. तर किनार्‍यालगत असलेल्या गावांना संभाव्य धोका टाळण्यासाठी हे बंधारे उपयुक्‍त ठरत होते. कोकण किनारपट्टीत राहणार्‍या लोकांना या बंधार्‍यांमुळे  संरक्षण मिळते. आता ‘सीआरझेड’चे नियम शिथिल झाल्याने व 50 मीटरची मर्यादा आल्याने अशा धूपप्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरूस्तीचे आणि नव्याने प्रस्तावित बंधार्‍यांचे काम मार्गी लागणार आहे. गुहागर तालुक्यातही पालशेत, आंबोशी बंदर व हेदवी धूपप्रतिबंधक बंधार्‍यांना त्यामुळे मंजुरी मिळाली आहे. यासाठी जिल्हा नियोजनात यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या निधीलाही मान्यता मिळाली आहे.