रत्नागिरी : दीपक शिंगण
भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करुन कोकणच्या दर्या-खोर्यांमधून प्रत्यक्ष रेल्वे गाडी आणण्याचे स्वप्न साकारलेल्या कोकण रेल्वेच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोकण रेल्वेची मार्ग दुरुस्ती व देखभालीचे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेच्या इतर झोनमध्येही वापरण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेकडून वापरण्यात आलेले ट्रॅक मेंटेनन्स तंत्रज्ञान देशात प्रभावी ठरले आहे. कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुर या 738 कि.मी.च्या रेल्वे मार्गावर वापरण्यात येणारी ट्रॅक मेंटेनन्सची पद्धत देशभरातील रेल्वे मार्गावर मॉडेल म्हणून स्वीकारावी, असे निर्देश रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वे झोन्सना दिले आहेत. त्यानुसार दक्षिण -पश्चिम रेल्वेच्या तीन झोनमध्ये कोकण रेल्वेच्या ट्रॅक मेंटेनन्स पद्धतीचा ‘मॉडेल’ म्हणून स्वीकारही करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या ‘कोरे’ शिवाय इतर 16 झोनमध्येही कोकण रेल्वेप्रमाणेच मार्ग दुरुस्ती व देखभाल करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने देशातील सर्व झोन्सना दिले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेने विकसित केलेले तंत्रज्ञान स्कायबस, जम्मू रेल्वे प्रकल्प तसेच ‘अॅन्टी कोलिजन डिव्हाईस’ (रेल्वे गाड्यांसाठी टक्कर प्रतिबंधक उपकरण) यांच्या माध्यमातून देशासह सर्वदूर आधीच पोहोचले आहे.