होमपेज › Konkan › खेड दिवाणी न्यायालयामुळे गैरसोय दूर

खेड दिवाणी न्यायालयामुळे गैरसोय दूर

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:08PMखेड : प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, केळशी येथील रहिवाशांना 200 किलोमीटरचे अंतर पार करून रत्नागिरीला वरिष्ठ दिवाणी दाव्यांसाठी जावे लागत होते. त्यामध्ये पैसा,वेळ व श्रम वाया जात होते. खेड, दापोली, मंडणगड, गुहागर व चिपळूण या तालुक्यांतील जनतेवर होत असलेला अन्याय खेड येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू झाल्याने दूर झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींचे सहकार्य लाभले असून त्यांना जनतेच्या वतीने विशेष धन्यवाद देणे गरजेचे आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खेड तालुक्यात वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हे न्यायालयात खेडमध्ये येण्याच्या प्रक्रियेत कोणाकोणाचे योगदान लाभले, याची माहिती देत कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी ना. कदम म्हणाले की, खेड येथे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करताना जिल्ह्यात कडाडून विरोध झाला होता. परंतु, त्यानंतर या न्यायालयाचे महत्त्व येथील जनतेला समजू लागले. वरिष्ठ दिवाणी न्यायालयात कोणतेही काम असले तर मंडणगड केळशीतील व्यक्‍तीला सुमारे 200 किलोमीटर अंतर पार करून रत्नागिरीला जावे लागत होते. खेड, दापोली, मंडणगड, गुहागर व चिपळूण तालुक्यातील जनतेचा वाया जाणारा वेळ, श्रम व पैसा वाचावा, यासाठी 5 वेळेला मंत्रिमंडळ बैठक घेऊन खेड येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय व्हावे, यासाठी विषयाची मांडणी केली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे संपर्क साधून निधी व कर्मचार्‍यांची तरतूद करण्यासाठी  आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे ना. कदम यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधी व न्याय विभागाचे सचिव  जमादार यांच्या विशेष प्रयत्न यामुळेच खेडसह पाचही तालुक्यांसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी मिळाली. त्याचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्याहस्ते होणे ही देखील एक आनंदाची बाब आहे. या कार्यक्रमाला मी जरी उपस्थित राहू शकत नसलो तरी माझ्या विशेष शुभेच्छा त्यासाठी आहेत.  या न्यालयामुळे उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण व गुहागरमधील जनतेची गैरसोय कायमची दूर होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.