Tue, Apr 23, 2019 23:56होमपेज › Konkan › खारेपाटण भागात आढळले प्राचीन बौध्द स्तूपाचे अवशेष

खारेपाटण भागात आढळले प्राचीन बौध्द स्तूपाचे अवशेष

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:24PMदेवगड : प्रतिनिधी

खारेपाटण लगतच्या शेजवली गावाजवळ असलेला ‘मठबावा’ म्हणजेच नवव्या शतकातील बौध्द स्तूप असल्याची माहिती इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य रणजित हिर्लेकर यांनी दिली. या स्तूपाच्या शोधामुळे कोकणातील बौध्द धर्मीयांचा इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे.

डॉ.अजय धनावडे यांच्या समवेत हिर्लेकर यांनी या स्तुपाची पाहणी व अभ्यास करुन यावर शिक्‍कामोर्तब केले आहे. स्तूप म्हणजे एखाद्या महान व्यक्‍तीची स्मृती चिरंतर राहण्यासाठी त्याचा अस्थी अथवा वस्तूवर बांधलेली वास्तू. दहाव्या शतकामध्ये बौध्द धर्माला ओहोटी लागली होती. याच काळात या भागात हा स्तूप कोरला गेला. त्या काळात दक्षिण कोकणावर नवव्या व दहाव्या शतकात वज्रयान या तांत्रिक बौध्द पंथाचा पगडा होता. यामुळेे या स्तूपाचे महत्व वाढले आहे.

जांभ्या खडकात अर्धवर्तुळाकृती ओट्यावर सुमारे सहा मीटर उंच व चार मीटर रूंद असा हा स्तूप कोरलेला आहे.  स्तूपाचा खालचा भाग मातीत  गाडला गेला आहे. पोकळ खोलीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ कोरले आहेत. यावर चैत्य कमान असावी, खडकाची झीज झाल्याने ते स्पष्ट दिसून येत नाही. रिकाम्या असणार्‍या देवळीत ज्या भिक्षूचा हा स्मारक स्तूप असेल त्याचा अस्थी किंवा अस्थी कलश किंवा सुटी पूजा वस्तू ठेवली असण्याची शक्यता श्री. हिर्लेकर यांनी व्यक्‍त केली. हा स्तूप दर्शनी बाजुला असून मागील डोंगर कड्याला जोडला आहे. यावरून हा स्तूप आठव्या किंवा नवव्या शतकातील असल्याचे निश्‍चित सांगता येते.  स्तूपाच्या माथ्यावर चौकोनी भाग असून यावर द्रविडशैलीमध्ये आढळणारी स्तुपिकेसारख्या आकाराची हर्मिका आहे.