Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Konkan › कुणबी समाजाला ठेकेदार पुढार्‍यांच्या जोखडातून मुक्‍त करा : कोळसे-पाटील

कुणबी समाजाला ठेकेदार पुढार्‍यांच्या जोखडातून मुक्‍त करा : कोळसे-पाटील

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:19PMआरवली ः वार्ताहर

समाजाचे आम्हीच भल करु म्हणणारेच तुमच्याशी खोटे बोलतात किंवा स्वार्थासाठी तुमची फसवणूक तरी करतात. असे पुढारी म्हणजे लांडग्याच्या घरी शेळी पाहुणी जाण्याचा प्रकार आहे. कुणबी समाजाला ठेकेदार पुढार्‍यांच्या जोखडातून मुक्‍त करा, असे भावनिक आवाहन  निवृत्त न्यायाधीश  बी. जे. कोळसे-पाटील यांनी केले.

कुणबी समाजातील  शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा मान्यवरांच्या हस्ते माखजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी निवृत्त न्यायाधीश  बी. जे. कोळसे-पाटील बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सहदेव बेटकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सहदेव बेटकर, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, माजी सभापती कृष्णा हरेकर, माजी उपसभापती संतोष डावल, जि. प. माजी सदस्य दीपक जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

संतोष गोटेकर, सुरेश जुवळे, अबू किंजळकर, दिनेश कातकर, दत्ताराम लांबे यांच्यासह समाजातील अंधश्रद्धा रुढी-परंपरांतून समाजाला मुक्‍त करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शंकर कवळकर, भाऊ शिगवण, आशाताई बोले, शिवराम मेणे, अमृता भुवड, दत्ताराम पड्यार, महादेव जाधव, दत्ताराम गेल्ये, देवीदास धनावडे, अर्जुन गोताड यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.   दहावी, बारावी व पदवीधर मुलांसह रशियात एम. बी. बी. एस. शिकणार्‍या स्नेहा भायजे हिचाही  सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील  पुढे म्हणाले की, कुणबी समाजाची ताकद फार मोठी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला असल्याने समाजाचे नुकसान होत आहे. एकेकाळी सात ते आठ आमदार कुणबी समाजाचे असत. आता 80 टक्के कुणबी समाज असूनही एकही आमदार कुणबी समाजाचा नाही, ही शोकांतिका आहे. राजकीय दबदबा निर्माण केल्याशिवाय कुणबी समाजाचा विकास होऊ शकत नाही, यासाठी सर्व कुणबी समाजाने एका झेंड्याखाली येण्याची गरज असल्याचे न्या. कोळसे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी सभापती सहदेव बेटकर, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, माजी सभापती कृष्णा हरेकर, माजी उपसभापती संतोष डावल, जि. प. माजी सदस्य दीपक जाधव आदींनी आपली मनोगते व्यक्‍त केली. कार्यक्रमाला भाऊ शिगवण, नाना कांगणे, शंकर भुवड, कृष्णा भुवड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.