Sat, Jul 20, 2019 11:05होमपेज › Konkan › राजापूरच्या गंगामाईचे पुनरामन!

राजापूरच्या गंगामाईचे पुनरामन!

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 10:25PMराजापूर : प्रतिनिधी

वैज्ञानिकांसमोर आव्हान निर्माण करणार्‍या राजापूरच्या गंगामाईचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. रविवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास गंगामाईचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षी 6 डिसेंबर 2017 रोजी अवतरलेली गंगामाई 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गंगामाईच्या आगमनाचे वृत्त समजताच भाविकांनी गंगाक्षेत्री धाव घेतली.

सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अवतरणार्‍या गंगेची गेल्या काही वर्षांत आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमूग्राल बदल झाला आहे. यापूर्वी गंगेचे 7 मे 2017 रोजी आगमन झाले होते. ती 19 जून रोजी अंतर्धान पावली होती. त्यापाठोपाठ त्याच वर्षी 6 डिसेंबर 2017 आगमन व 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. पुन्हा मात्र आता अवघ्या 4 महिन्यांनी तिचे पुन्हा आगमन झाल्याने गंगा भक्तांना सुखद धक्का बसला आहे. गंगा आगमनाचे वृत्त कळताच सर्वांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेत खात्री करून घेतली तर काहींनी गंगा स्नानाचा लाभही घेतला. सर्वसाधारणपणे उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात. 

सध्या कोकणात पाऊसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गंगा आगमनाची चाहूल मिळत नव्हती. मात्र, 4 महिन्यांपूर्वीच अंतर्धान पावलेली गंगामाई इतक्या लवकर पुन्हा कशी अवतरली, असा सवाल निर्माण आता निर्माण झाला आहे. आपल्या आगमन-निर्गमनाबाबत भल्या-भल्या वैज्ञानिकांना तोंडात बोटे घालायला लावणार्‍या गंगामाईने यातून आणखी एक धक्का दिला आहे.

या पूर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्या नंतर जवळपास तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधाण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूपच लांबला होता. आता अवघ्या 4 महिन्यांतच तिचे आगमन झाले आहे. तीर्थक्षेत्रावरील पुजारी राहुल काळे हे बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पूजेसाठी गेले असता त्यांनी गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने चांगलीच पाण्याने भरली होती. सर्वात मोठे काशिकुंडे पूर्ण भरल्याने गोमुखातून हळुहळू पाणी वाहत होते. काही वेळाने या प्रवाहात चांगलीच वाढ झाली होती. गंगा क्षेत्री मूळ गंगेचा प्रवाह मोठ्या स्वरूपात वाहत होता.

भूगर्भातील बदलांचा परिणाम?

भूगर्भामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. भूगर्भात काही घडामोडी घडल्यानंतर गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरातमध्ये भूकंपाचा मोठा दणका बसला त्यावेळीही गंगेचे आगमन झाले होते. जेव्हा त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासह अवघ्या जगाला बसला होता, तेव्हाही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. एकदा तर गंगाक्षेत्रात बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाल्यावर दुसर्‍या दिवशी गंगा अवतरली होती.