Sun, Mar 24, 2019 08:19होमपेज › Konkan › ब्लॅाग : दिग्गजांना नाकारले, नवख्यांना स्वीकारले

ब्लॅाग : दिग्गजांना नाकारले, नवख्यांना स्वीकारले

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:13PMरत्नागिरी : योगेश हळदवणेकर

जिल्ह्यातील देवरूख आणि गुहागर नगर पंचायतींचा निकाल लागला आणि मोठमोठ्या नेत्यांना मतदारांनी दणका दिल्याचे उघड झाले. देवरूखात शिवसेनेच्या माजी आ. रवींद्र माने आणि सुभाष बने यांना तर गुहागरात राष्ट्रवादीच्या आ. भास्कर जाधव यांना जनतेने साफ नाकारले. देवरूखात भाजपचे ‘कमळ’ ‘मनसे’च्या इंजिनाच्या सहाय्याने फुलले तर गुहागरात घड्याळाची टिकटिक शहर विकास आघाडीने बंद केली. रत्नागिरी न.प.च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ‘उदय’ कायम राहिला आहे.

गुहागर आणि देवरूख या नगर पंचायती स्थापन झाल्यापासून ही दुसरी निवडणूक पार पडली. पहिल्या निवडणुकीत देवरूखात शिवसेनेने वर्चस्व राखले होते. पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान शिवसेनेच्या नीलम हेगशेट्ये यांना मिळाला होता. देवरूखात शिवसेना आणि भाजप यांची सत्ता अडीच वर्षे ‘नांदा सौख्य भरे’ या प्रमाणे चालली. मात्र, त्यानंतर पुढील अडीच वर्षांत कुठेतरी माशी शिंकली आणि युतीत बेबनाव झाला. त्यावेळी रवींद्र माने हे राष्ट्रवादीत होते. तर सुभाष बने हे शिवसेनेत होते. त्यामुळे त्या अडीच वर्षांत देवरूखच्या मानेंनी रत्नागिरीच्या मानेंशी मैत्री करून बनेंशी फारकत घेतली. ही फारकत पुढे अडीच वर्षे राहिली. या अडीच वर्षांत राष्ट्रवादी-भाजप आणि काँग्रेस अशी अभद्र युती उदयास आली. ही युती झाली त्यानंतर अल्पावधीत राष्ट्रवादीतून रवींद्र माने शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. माने आणि बने एकत्र आले म्हणजे शिवसेनेची ताकद वाढेल, असे चित्र निर्माण झाले होते.

मात्र, तसे झालेच नाही. उलट शिवसेनेच्या 7 वरून 4 जागा झाल्या. अर्थात सेना बॅकफूटवर गेली. तर भाजपने मात्र सेनेशी फारकत घेत ‘मनसे’ला जवळ करून निवडणूक लढवल्यामुळे 5 वरून 7 जागांवर यश मिळवले. त्यासोबत ‘मनसे’लाही खाते खोलण्यास संधी निर्माण करून दिली. रवींद्र माने राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले. त्याचा फटका राष्ट्रवादीला यावेळी बसला. राष्ट्रवादीची एक जागा कमी होत 3 वर आली. मात्र, शिवसेनेची जागा न वाढता भाजप आणि ‘मनसे’ यांना यश मिळाल्याने मानेंचा करिष्मा राहिला नसल्याचे उघड झाले. 

देवरूखात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळ ठोकला होता. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनाचा माने आणि बने यांना यावेळी दणका बसला. यावेळी देवरूखात भाजपच्या एका बड्या नेत्याने हस्तक्षेप न केल्यामुळे किंवा तसा हस्तक्षेप करण्याची संधी स्थानिकांनी न दिल्यामुळे ना. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कमळ’ फुलले. भाजपच्या मृणाल शेट्ये  नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-मनसे युतीने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला. यापूर्वी वैभवी पर्शराम या बिनविरोध अपक्ष म्हणून निवडून आल्या. अपक्ष नगरसेवक आपल्या सोबत घेऊन बहुमताचा आकडा भाजप गाठू शकतो.  ‘मनसे’ने यावेळी खाते खोलले, काँग्रेसने आपली जागा कायम ठेवली तर राष्ट्रवादी व सेना बॅकफूटवर गेले.

गुहागर नगरपंचायतीचा विचार करता राष्ट्रवादीचे नेते आ. भास्करशेठ जाधव यांनी यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने एकहाती 11 जागा मिळवत सत्ता काबीज केली होती. यावेळी ‘शेठ’ ना जनतेने साफ नाकारले. थेट  अकरावरून एकवर राष्ट्रवादी पक्ष आला. गत निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा ‘भास्कर’ तळपता होता. मात्र, यावेळच्या निकालात तो  थंडावला. भास्कर जाधव यांच्या हातून सत्ता जाण्यात राजेश बेंडल यांची नाराजी आणि असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळल्याची घटना कारणीभूत ठरली. राजेश बेंडल यांनी ‘शहर विकास आघाडी’च्या नावाने आपली फळी उभारत प्रस्थापितांना दणका दिला. ‘शहर विकास आघाडी’ने यावेळी शिवसेनेच्या मदतीने 9 जागा जिंकल्या. शिवसेनेलाही 1 जागा मिळाली. गतवेळी शिवसेनेच्या 6 जागा होत्या. भाजप तर नामशेषच होता. मात्र, यावेळी भाजपने 6 जागा जिंकत पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.

डॉ. विनय नातू यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनाचा फायदा भाजपला यावेळी झाला. येथे पाच वर्षांपूर्वी भाजप शून्यावर होता. मात्र, शून्यातून विश्‍व निर्माण करावे, तसे शून्यातून सहा जागा भाजपने जिंकल्या. शिवसेना आणि शहर विकास आघाडी यांच्या युतीच्या 10 जागा असल्याने येथे सत्ता काबीज करण्यात त्यांना यश आले आहे. भाजप, राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागणार आहे. राष्ट्रवादीने गत निवडणुकीवेळी एकहाती सत्ता मिळवत जयदेव मोरे यांना पहिले नगराध्यक्ष केले होते. त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. राजेश बेंडल हे त्यावेळी राष्ट्रवादीत होते. मात्र, यावेळच्या निवडणुकीत बेंडल यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून शहर विकास करण्याचा चंग बांधला. जिथे मते कमी पडली तिथे शिवसेनेला साथीला घेऊन सत्ता काबीज केली. गुहागरात बेंडल यांनी ‘करून दाखवलं’ अशी जोरदार चर्चा आहे. 

एकूणच देवरूख आणि गुहागरचा विचार करता भाजपच्या जागा दोन्हीकडे वाढल्या आहेत. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा दोन्हीकडे कमी झाल्या आहेत. भाजपच्या जागा वाढण्याचे श्रेय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनाला जात आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनापुढे रवींद्र  माने- सुभाष बने-भास्कर जाधव हे चितपट झाले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर हे प्रचारात उतरले असताना गुहागर आणि देवरूखात त्यांना मुसंडी मारण्यास जमले नाही. 

रत्नागिरीच्या प्रभाग क्र.3 ‘ब’ मध्ये  शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या राजेश सावंत यांचा करिष्मा चालला नाही. राजेश सावंत शिवसेना सोडून गेल्यानंतर पूर्वीची भाजपची मते आणि राजेश सावंत यांची मते यांचे गणित बांधता भाजपला ही जागा जिंकता येणे शक्य होते. मात्र, येथे शिवसेनेचे आ. उदय सामंत यांचा ‘रत्नागिरी पॅटर्न’ यशस्वी झाला आहे. शिवसेनेच्या राजन शेट्ये यांनी ही जागा जिंकल्याने भाजपला येथे फारसा चमत्कार करता आलेला नाही. रत्नागिरीत ‘शत-प्रतिशत भाजप’ या धोरणाला सुरूंग लावण्याचे काम शिवसेनेने केले असून खर्‍याअर्थाने रत्नागिरी हा शिवसेनेचा ‘उदय’ करणारा बालेकिल्ला ठरला आहे. शिवसेनेसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची होती. ती राखण्यात सेनेला यश आले. यामागे शिवसेनेच्या आ. उदय सामंत आणि सहकार्‍यांची मेहनत दिसते. एकूणच काय की शिवसेनेचा रत्नागिरीचा गड कायम राहिला. मात्र, देवरूख आणि गुहागरात अजून शिवसेना दिग्गज नेते असतानाही बाळसे धरताना दिसत नाही.

Tags : Konkan, Rejected,  giants, accepted,  newcomers