Thu, Feb 21, 2019 00:58होमपेज › Konkan › विहिरींची नोंदणी करणे आता बंधनकारक

विहिरींची नोंदणी करणे आता बंधनकारक

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:25PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन नियम 2018 नुसार प्रत्येक विहीर मालकास विंधन विहीर, खोदलेली विहीर, कुपनलिका इत्यादींंची नोंदणी उपजिल्हाधिकार्‍यांकडे करणे बंधनकारक करण्यात आली आहे. विहीर खोदल्यापासून 180 दिवसाच्या आत त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्यात सर्वसाधारणपणे 60 मीटर (200 फूट) खोलीची विहीर खोदण्यास परवानगी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त खोलीची विहीर ही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देता येईल. 100 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असेल तर अशा बांधकामावर पाऊस पाणी साठवण संरचना बांधणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता दिली जाणार नाही.

पाण्याच्या सतत वाढणार्‍या मागणीमुळे भूजलाच्या स्रोतांवरील वाढणारा ताण आणि अति उपशामुळे घटत चाललेली भूजल पातळी यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 पारित केला. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2009 मधील प्रयोजने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 25 जुलै रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र भूजल नियम 2018 चा मसुदा नियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायासाठी प्रसिद्ध केले आहेत. या नियमाबाबतच्या हरकती नोंदवण्यासंबंधी कार्यशाळा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात विंधन विहीर खोदकामाचा व्यवसाय करू इच्छिणार्‍या कोणत्याही विंधन यंत्र मालकास आपल्या यंत्राची नोंदणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे करावी लागेल. या नियमांचा सविस्तर मसुदा महाराष्ट्र शासनाच्या ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरती कायदे व नियम या घटकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

या मसुदा नियमासंबंधी जिल्ह्यातील नागरिक तसेच इतर घटकांच्या हरकती अथवा सूचना ऐकून घेण्यासाठी शामलाल गोयल (भा.प्र.से - अतिरिक्त मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) हे 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येेथे सकाळी 11 वा. उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दुपारी 4 वाजता उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, संस्था व इतर घटकांना महाराष्ट्र भूजल नियम 2018 च्या मसुद्याबाबतच्या हरकती नोंदवण्यासाठी माहिती समजून घेण्यासाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. शिवाजी थोरात यांच्याशी संपर्क साधावा.