होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधाची वज्रमूठ

रिफायनरी विरोधाची वज्रमूठ

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:15PMराजापूर : प्रतिनिधी

आंदोलनाची धार कमी होऊ नये, यासाठी प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय खासदार- आमदार तसेच मंत्री येत्या 28 जानेवारी रोजी सागवे येथे येत आहेत, अशी माहिती रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम मुंबईतील अंधेरी येथील होली स्पिरिट हॉस्पिटलच्या आवारातील सभेत यांनी दिली.

उपचार घेत असलेल्या वालम यांनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या परवानगीने तेथे जमलेल्या प्रकल्पविरोधी ग्रामस्थांशी बाहेर येत संवाद साधला. नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी सभेदरम्यान झालेल्या हाणामारीत वालम यांना आरोपी करून पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आल्यानंतर प्रकृती खालावल्याने वालम यांना रत्नागिरी येथील शासकीय तसेच नंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजापूर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अंधेरी येथील होली स्पिरिट हॉस्पिटल मध्ये वालम हे पुढील उपचार घेत आहेत. मात्र तेथेही रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलनाच्या 
घडामोडी सुरू आहेत. 

वालम तसेच प्रकल्पग्रस्तांवरील पोलिसी कारवाईनंतर रिफायनरी विरोधी आंदोलनाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच वालम यांनी मात्र हॉस्पिटलमधून देखील आंदोलनाची सूत्रे हलविण्याचे काम सुरू ठेवले आहे. दि.28 रोजी येणारे सर्वपक्षीय आमदार-खासदार आणि मंत्री हे आगामी काळात होणार्‍या रिफायनरी विरोधातील आंदोलनाला सहभागी होण्याचे वचन जनतेसमोर देणार आहेत. त्या

पार्श्‍वभूमीवर ही आढावा बैठक असल्याचे वालम यांनी प्रकल्पविरोधकांसमोर स्पष्ट केले. आपल्या प्रकृतीपेक्षा रिफायनरी आंदोलनाच्या नियोजनाची व भवितव्याची आपणाला चिंता आहे.सध्या काही प्रशासकीय अधिकारी जमीन दलालांना हाताशी धरून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या रात्रंदिवस दलालांचा आहे. अशावेळी स्वस्थ बसून चालणार नाही. काही शासकीय अधिकार्‍यांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. शेतकर्‍यांनी शासनाला संमत्तीपत्रे दिलेली नसून ती काही जमीन दलालांनी दिलेली असतील. अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही वालम यांनी यावेळी केले. लवकरच भ्रष्ट अधिकारी व दलांलांवर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.