Fri, Mar 22, 2019 23:49होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्प रद्द करावाच लागेल

रिफायनरी प्रकल्प रद्द करावाच लागेल

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:38PMराजापूर  : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक जनतेची असलेली अभेद्य एकजूट यामुळे केंद्र आणि राज्य शासनाला नाणारमधील जनतेवर लादलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द करावाच लागेल. किंबहुना नाणार परिसरात रिफायनरी होणारच नाही, असे कोकण विनाशकारी रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  दरम्यान, प्रकल्प रद्द झाल्यानंतर प्रकल्प विरोधी समितीच्या वतीने येथील जनतेच्या हाताला काम देण्यासाठी एक धोरण निश्‍चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर काही सकारात्मक बाबी प्राप्‍त होऊ लागल्या आहेत. शासनाने कितीही प्रयत्न केला तरी येथील जनतेचे अभेद्य एकजूट यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही आणि होऊ घातल्यास तो आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराच अशोक वालम यांनी दिला.

दरम्यान, नाणार रिफायनरीला विरोध करण्याच्या निमित्ताने या परिसरात फिरत असताना येथील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी येथे पर्यावरणपूरक उद्योगधंदे यावेत, अशी चर्चा होत होती. रिफायनरी विरोधात केलेल्या आवाहनाला येथील जनतेने भरभरून साथ दिली. आता रिफायनरी रद्द होणारच आहे. त्यामुळे आता येथील तरूणांच्या हाताला काहीतरी काम देण्याचा विचार आपल्या मनात आला. याबाबत आपण समितीतील काहीजणांशी व काही उद्योजकांशी चर्चा केली. त्यानंतर कोकणातील तसेच मुंबईतील आपल्या संपर्कातील उद्योजकांशी चर्चा झाली आहे. लवकरच या स्तरावर नियोजबद्ध काम केले जाईल, असे वालम यांनी स्पष्ट केले.

यासाठी आपण तसेच जैतापुरातील विलास मांजरेकर यांच्यासह एक दोन नव्हे तर तब्बल 42 मोठे उद्योजक नाणारसह लगतच्या चौदा गावांतील शेतकरी अथवा स्थानिकांना तेथेच उद्योग उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकर्‍यांनी आपल्या कातळ जमिनीबाबत ठराविक वर्षांचा सामंजस्य करार केल्यास येथे उभ्या राहणार्‍या उद्योगधंद्यांतील 25 टक्के नफा त्या शेतकर्‍यांना देण्याची तयारी या उद्योजकांनी दर्शवली असल्याचे वालम यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती देताना वालम यांनी सांगीतले की, जे मुंबईतील उद्योजक गावी येऊन आपले उद्योग सुरू करू इच्छितात, त्यांच्या मुंबईतील फॅक्टरीचे कामकाज कसे चालते याची माहिती घेण्यासाठी स्थानिक मंडळींना मुंबईत येण्याचे आपण निमंत्रण देत आहोत. यासाठी जाण्या-येण्याचा खर्च प्रत्येकाने करावयाचा असून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईत ज्या वस्तूचे उत्पादन होते त्याचे या ठिकाणी उत्पादन केल्यास त्यापोटी होणारा जाण्या-येण्याचा वाहतूक खर्च अधिक धरला तरी नफ्यात फारशी घट होणार नाही, असे त्यांनी सांगीतले. या बाबत लवकरच सोसायटीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती  वालम यांनी यावेळी दिली.