Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Konkan › मोजणी होणार की थांबणार?

मोजणी होणार की थांबणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

स्थानिक जनतेचा प्रखर विरोध सुरू असतानाही तो न जुमानता प्रशासनाने सुरू केलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या मोजणीला स्थगिती द्यावी, असे आदेश जिल्ह्याचे पालक मंत्री वायकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले असतानाच दुसरीकडे मोजणी थांबविण्यात आलेली नसल्याचा  जिल्हाधिकार्‍यांचा उल्लेख असलेला मेसेज व्हॉटस् अ‍ॅपवरून  फिरत असल्याने  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रिफायनरीच्या मोजणीला नक्‍की स्थगिती मिळाली का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

मागील सोमवारपासून नाणारसह पाळेकरवाडी, डोंगर-दत्तवाडी, सागवेतील कात्रादेवीवाडी या ठिकाणी प्रशासनाने संपादित केलेल्या जमिनींच्या मोजणीचे काम सुरू केले होते. मात्र, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे सुरू केलेल्या  मोजणीत सातत्याने व्यत्यय येत होता. केवळ नाणारमध्येच काही ठिकाणी मोजणी सुरू होती तर उर्वरित तिन्ही ठिकाणी आंदोलकांनी मोजणी बंद पाडली होती. एकदा तर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते.

दरम्यान, पहिले दोन दिवस काहीशी मोजणी पार पडली होती. मात्र, नंतरचे तीन दिवस तर मोजणीसाठी गेलेले प्रशासकीय अधिकारी बसूनच होते. त्याचवेळी आंदोलक अधिक आक्रमक होत होते.पाच दिवस उलटले तरी प्रखर विरोधामुळे  समाधानकारक मोजणी होत नव्हती. प्रशासन मोजणीचे काम रेटण्याच्या तयारीत होते. भूमिअभिलेख विभागाकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांवर त्या विभागाचा शिक्‍काच नव्हता. त्यावरूनही वादंग सुरू होते. त्यामुळे प्रशासनविरुद्ध प्रकल्पग्रस्त यांच्यातील सुरू असलेला संघर्ष थांबणार तरी कधी, याकडे सर्वांचे लक्ष असतानाच जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रशासनाच्या मोजणीबाबतच्या प्रकाराला तीव्र हरकत घेतली.

स्थगितीबाबत संभ्रम

सर्वप्रथम  पालकमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नंतर जिल्हाधिकार्‍यांनी मोजणीला स्थगिती देण्यात आली नसल्याचे विधान सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खरोखरच जिल्हाधिकार्‍यांकडून तसे स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर तो मेसेज सोशल मीडियावर टाकण्यात आला होता, याची निश्‍चिती होत नव्हती.