Sun, Apr 21, 2019 01:59होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधी संघटनेचे घुमजाव

रिफायनरी विरोधी संघटनेचे घुमजाव

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:56PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थापन केलेली अशोक वालम यांची संघटना व स्थानिकांची संघटना या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यामुळे वालम यांच्या संघटनेशी आमच्या संघटनेचा काहीही संबंध नाही. आमची संघटना सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन प्रकल्पविरोधी लढा असाच पुढे सुरू ठेवेल, असे घुमजाव करणारे स्पष्टीकरण रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम व मजिद भाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

रिफायनरी प्रकल्पाविरोधात सध्या जोरदार आवाज उठविण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या एकजुटीने नागपूर येथे रिफायनरीच्या विरोधात पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणामुळे सरकारवरही दबाव आला आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही नेत्यांच्या मागे न जाता आपली प्रकल्पविरोधी काढलेली संघटना मजबूत करा, असे आवाहन कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष वालम यांनी केले होते. दरम्यान, श्री. वालम यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता आमची शेतकरी व मच्छीमारांची स्वतंत्र संघटना असून, आम्ही सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा प्रकल्पविरोधी लढा सुरू ठेवणार असल्याचे शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देण्यात आले.