Fri, Apr 26, 2019 09:44होमपेज › Konkan › ‘नाणार’चे पाप आमच्या माथी नको

‘नाणार’चे पाप आमच्या माथी नको

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:08PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्प हा मुळात विनाशकारी आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील गावामध्ये झाल्यास केवळ राजापूर तालुकाच नव्हे तर निसर्गसंपन्न कोकणच उद्ध्वस्त होणार असल्याचा आक्षेप घेत येथील जनतेला हा प्रकल्प नको आहे. त्यामुळे तुमचे पाप आमच्या माथी मारू नका, असा  इशारा रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत  यांनी भाजपला  दिला. 

मुंबई येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या रिफायनरीविरोधी सभेत ते बोलत होते. राजापूर तालुक्यातील नाणार गावासह परिसरातील गावांमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांमधून जोरदार विरोध होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने स्वनेतृत्वाखाली रिफायनरीविरोधी लढा सांभाळण्याचा निर्णय घेत या प्रकल्पाबाबत आपली दिशा व भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये रविवारी सभा राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी आयोजित केली होती. शिवसेनेने राजापूर तालुक्यातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या सभेला मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तेतील भाजपवर सडकून टीका केली. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून मित्रपक्ष शिवसेनेला कमकुवत करू पाहत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेहमीच पाठीशी असलेली कोकणी जनता हे मनसुबे उधळून लावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कोकणामध्ये फळ प्रक्रियेवर आधारित प्रकल्प होणे गरजेचे असताना तेथे विनाशकारी प्रकल्प आणून त्याचे पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मुळातच स्थानिक जनतेला हा प्रकल्प नको असल्याने व प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे शिवसेना असल्याने हा प्रकल्प होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पहिल्यापासूनच प्रकल्पग्रस्तांबरोबर असून हा प्रकल्प रद्द करण्याची ताकद फक्त शिवसेनेतच आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विरोधाबाबत कोणी सोम्या-गोम्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी सेना विरोधकांना हाणला. काही लोक यात अपशकून करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने प्रकल्प विरोधासाठी सभा घेतलेली असताना विरोधक दुसरी सभा लावून प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या अशा कृत्यामुळे प्रकल्पग्रस्त चुकीच्या दिशेने जात आहेत. मात्र, तुम्हा प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांना त्याने बळ दिले.

कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे होऊच द्यायचा नाही, असे सांगत रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या सभेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीविरोधात प्रकल्प होऊ घातलेल्या गावांमध्ये बैठक घेऊन विरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वाडवडिलांची जमीन विकू नका, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी येणार्‍या दलालांना उभे करू नका. अन्यथा एक एक करून पतप्रांतीय येथे जम बसवतील व कोकण  उद्ध्वस्त करतील, असे ते म्हणाले.

यावेळी आमदार राजन साळवी, आमदार अजय चौधरी, माजी आमदार गणपत कदम यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, माजी संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, प्रकाश वाघधरे, मीनल जुवाटकर, सुहास तावडे, नंदूशेठ थरवळ, बबन सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रप्रकाश नकाशे यांनी केले.