होमपेज › Konkan › कोकण रेल्वेमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी भरती

कोकण रेल्वेमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी भरती

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 11:23PMरत्नागिरी :  प्रतिनिधी

कोकण रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर, गुडस् गार्ड, अकाऊंटस् असिस्टंट, वरिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ यांची एकूण 178 पदे भरण्यात येणार असून प्रकल्पग्रस्तांनाच या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली. कोकण रेल्वेमध्ये सध्या 5195 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी 2882 हे प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त आहेत. केवळ 10 टक्के अधिकारी व कर्मचारी हे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या स्थानिक भागाबाहेरील आहेत. सुमारे 90 टक्के स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांना सामावून घेणार्‍या कोकण रेल्वेमध्ये आता 178 पदांसाठी भरती होणार आहे.

यामध्ये 55 स्टेशन मास्तर, 37 गुडस् गार्ड, 11 अकाऊंटस् असिस्टंट, 10 वरिष्ठ लिपिक, 38 इलेक्ट्रिशन, 27 सिग्‍नल अ‍ॅण्ड टेलिकॉम मेंटेनर यांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त उपलब्ध न झाल्यासच अन्य उमेदवारांचा विचार करता येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा फॉर्म व अन्य सविस्तर माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इलेक्ट्रिशन, सिग्‍नल अ‍ॅण्ड टेलिकॉम मेंटेनरसाठी 30 एप्रिल ही अंतिम तारीख आहे तर स्टेशन मास्तर, गार्ड, लिपिक, अकाऊंटस् असिस्टंट पदासाठी 12 मे अंतिम मुदत आहे.