Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Konkan › नाटळ नदी पुनर्जीवन उपक्रमास जलसंधारणअंतर्गत मान्यता

नाटळ नदी पुनर्जीवन उपक्रमास जलसंधारणअंतर्गत मान्यता

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:06PMकणकवली : प्रतिनिधी

नाटळ ग्रामविकास मंडळ व ‘नाम’ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या नाटळ नदी पुनरूज्जीवन उपक्रमास जलसंधारण अंतर्गत पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र मध्यम प्रकल्प विभाग आंबडपालचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी ग्रामविकास मंडळाला दिले आहे. 

यासाठी नाटळ ग्रामविकास मंडळाचे मागणीपत्र व कणकवली तहसीलदारांची शिफारस विचारात घेवून ही कार्यवाही करण्यात आली आहे. ग्रामविकास मंडळाच्यावतीने गावातील सुमारे 9 कि.मी. लांब नदीपात्रातील गाळ उपसा लोक सहभागातून करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गाळ उपशाबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी गॅबीयन व भूमिगत बंधारेही बांधण्यात येत आहेत. हे काम जलसंधारण मोहीमेंतर्गत अंर्तभूत करावे अशी मागणी ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची भेट घेवून केली होती. त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार त्यांनी कणकवली तहसीलदारांमार्फत केला होता. मंडळाच्या या प्रयत्नांना यश आले असून पाटबंधारे विभागाने या कामाचा समावेश जलसंधारण मोहीमेअंतर्गत केला आहे. 

याबाबत मंडळास पाठविलेल्या पत्रात पाटबंधारे अभियंत्यांनी म्हटले आहे, ग्रामविकास मंडळाचा हा उपक्रम प्रेरणादायी व स्तुत्य आहे. कामाचे एकंदरीत स्वरूप व त्यातील जनहित पाहता या संपूर्ण कामास जलसंधारण अंतर्गत मंजुरी देण्यात येत आहे. यासाठी नदीपात्रालगतच्या खाजगी जमीन मालक, शेतकरी यांची लेखी संमती घ्यावी जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून कुठलीही तक्रार उपस्थित होणार नाही. गाळ उपसा करताना निघणार्‍या गौण खनिजाबाबत महसूल विभागाकडून स्वामित्व धनाबाबत आवश्यक ती कार्यवाही मंडळाने करावी.

खोदकामादरम्यान निघालेली माती व अनावश्यक दगड गोटे आदीची योग्य विल्हेवाट लावावी, आदी अटी व मार्गदर्शक सूचना पाटबंधारे अभियंत्यांनी केल्या आहेत. नाटळ गाव नरडवे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत असून या प्रकल्पाचा लाभही गावाला होणार आहे. पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या उपक्रमाची लवकरच पाहणी करून मार्गदर्शन करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. अशाप्रकारे या उपक्रमावर शासकीय मोहर उठल्याने नाटळ ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.