Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Konkan › जादा २०२ गाड्यांचे नियोजन; रत्नागिरी क्षेत्रात अतिरिक्‍त तिकीट खिडक्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:59PMरत्नागिरी :  खास प्रतिनिधी

येत्या गणेशोत्सवाकरिता कोकण रेल्वेतर्फे रेल्वेच्या 202 जादा फेर्‍या चालविल्या जात आहेत.  मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे यांच्या सहयोगाने मुंबई, पुणे, अजनी (नागपूर) व अहमदाबाद येथून रत्नागिरी, सावंतवाडी, झाराप, पेडणे, थिविम, मडगाव तसेच मंगळूरु दरम्यान या जादा फेर्‍या चालविल्या जात आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत  या वर्षी प्रत्येक गाडीला अतिरिक्‍त डबे लावण्याची व्यवस्था करण्यात आली  असून यावर्षी अधिक प्रवाशांची सोय होणार आहे.

खास गणेशोत्सवाकरिता म्हणून रत्नागिरी क्षेत्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर नेहमीपेक्षा जास्त तिकीट खिडक्या उपलब्ध केल्या जात आहेत, गणेशोत्सवादरम्यान अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणीची व्यवस्था अधिक कडक  करण्यात आली आहे.  तसेच सर्व उपाहारगृहांना गणेशोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना पुरे पडण्यासाठी म्हणून अतिरिक्‍त टेबल व फिरत्या ट्रॉली उपलब्ध करून देण्याकरिता आदेश देण्यात आले आहेत. 

खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी अचानक उद्वणार्‍या वैद्यकीय गरजांसाठी वैद्यकीय तपासणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.  कोकण रेल्वे प्रशासन एस.टी. महामंडळाच्या संपर्कात असून सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या बससेवेचे नियोजन करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या आरामदायक, सुविधाजनक आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेतर्फे प्रवासी व्यवस्था करण्यात आली आहे.  अधिक सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल दले तैनात करण्यात आली आहेत.  यासाठी कोकण रेल्वेच्या अन्य विभागातील  रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही रत्नागिरी विभागात तैनात करण्यात येत आहेत.  रेल्वे सुरक्षा बल आणि होमगार्ड मिळून एकूण 207 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून रेल्वे गाड्यांमध्येही फिरती पथके नेमण्यात आली आहेत. 

याचबरोबर रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांना ट्विटर तसेच सुरक्षा हेल्प लाईन क्र.182 मार्फत येणार्‍या सर्व संदेशांचे निरीक्षण करून त्वरित मदत पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सात शहरांमध्ये 8 टपाल कार्यालयांत आरक्षण सुविधा

‘कोरे’कडून प्रवाशांच्या सोयीसाठी 7 शहरांमधील  8  वेगवेगळ्या  टपाल कार्यालयांमध्येही आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.  तसेच नऊ टाऊन बुकिंग एजन्सीमध्ये आरक्षणाची सोय उपलब्ध आहे.  या व्यतिरिक्‍त सावंतवाडी आणि रत्नागिरी स्थानकांत प्रवाशांच्या सोयीसाठी जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक कार्यरत आहेत.