Wed, Aug 21, 2019 19:13होमपेज › Konkan › वाचन संस्कृतीने प्रतिभावंत विद्यार्थी घडतील : मधुभाई

वाचन संस्कृतीने प्रतिभावंत विद्यार्थी घडतील : मधुभाई

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 9:45PMआरवली : वार्ताहर

मुलांमध्ये सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी हुतात्मा शिरीषकुमार वाचनालय प्रेरणास्थान ठरेल. पालकांनी सुद्धा येथेे यावे आणि साहित्य वाचावे. मुलांसाठी हे वाचनालय म्हणजे ज्ञानगंगा आहे. आरवली नं. 1 शाळेतून भविष्यातही अनेक साहित्यिक जन्माला येतील.वाचन संस्कृतीने या शाळेतून प्रतिभावंत विद्यार्थी नक्‍कीच घडतील, असा विश्‍वास पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्‍त केला.   
आरवली शाळा नं.1 येथे हुतात्मा शिरीषकुमार वाचनालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन श्री.कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गुरूवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जि. भि. दळवी, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, अ‍ॅड. भरत प्रभू , डॉ. प्रसाद साळगावकर, श्रीमती गंधाली शेलटे, भाऊ शिरोडकर, सचिन दळवी, बापू राऊळ आदी उपस्थित होते. 

कर्णिक पुढे म्हणाले, आरवली गावातील साहित्यावर प्रेम करणार्‍या लोकांच्या आदरापोटी मी इथे आलो आहे. या गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी म्हणजे माझे जवळचे मित्र होते.आरवली आणि दशक्रोशी साहित्याने भरलेली आहे. ‘ज्ञानपीठ’कार वि.स. खांडेकर, जयवंत दळवी, जि.भि.दळवी, श्री. रेगे, पु.रा. बेहरे, ‘नवशक्‍ती’कार कालेलकर ही मंडळी याच मातीतील आहेत. नुसती पैशांची श्रीमंती असून चालत नाही, मन खानदानी श्रीमंत हवे. समाजाचे दोन भाग आहेत. श्रेयस म्हणजे गरीब आणि प्रेयस म्हणजे श्रीमंत. जे हवेसे वाटते त्या सुखाची अपेक्षा म्हणजे प्रेयस तर माझ्याकडून एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटणे म्हणजे श्रेयस. समाजाला श्रेयसाची आवश्यकता आहे. आरवली शाळेतील हे हुतात्मा शिरीषकुमार वाचनालय म्हणजे तुम्हा लोकांना मिळालेली संधी आहे. समाजातील विषमता नष्ट होण्यासाठी ही वाचन चळवळ महत्त्वाची आहे. 

जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी शुभेच्छा देताना या वाचन संस्कृतीच्या उपक्रमाचे कौतुक केले.जि. प.कडून शाळेला संपूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. गुरूवर्य जि. भि. दळवी यांनी मुलांना दर्जेदार, प्रतिभावंत घडविण्यास हे वाचनालय उपयुक्‍त ठरेल, असे सांगितले.अ‍ॅड.भरत प्रभू यांनी भाषा आणि राष्ट्र याबद्दल कमालीचा आदर, प्रेम निर्माण व्हावे यासाठीचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक सागर कानजी यांनी मानले.कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.